करोना विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणू विरोधात समाजातील प्रत्येक घटक आपल्या परीने लढा देताना दिसत आहे. मात्र काही करोना योद्धे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावत आहेत. यामध्ये डॉक्टर, परिचारिका व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्यापासून मागील तीन महिन्यांपासून राज्यभरातील पोलीस दिवस-रात्र रस्त्यांवर खडा पहारा देत आहेत. तर आपल्यामुळे आपल्या कुटुंबातील कोणालाही करोनाचा संसर्ग होवू नये म्हणून अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कुटुंबापासून दूर राहून, आपले कर्तव्य बजावत आहेत. अशाच प्रकार एका कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचे एक वेगळे उदाहरण समोर आले आहे.

पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमधील हवालदार दीपक लांडगे यांना 14 मार्च रोजी मुलगी  झाली.  मात्र करोना लॉकडाउनमध्ये ते कर्तव्यावर असल्याने ते जवळपास 60  दिवस आपल्या लेकीला भेटू शकले नव्हते. पत्नीला प्रसूती अगोदरच गावी पाठवण्यात आलेले असल्याने त्यांना तिकडे जाणंही शक्य नव्हतं.  इतके दिवस केवळ व्हिडिओ कॉलद्वारेच ते आपल्या लेकीला पाहत होते. तिला भेटण्याची आपल्या हातात घेण्याची इच्छा असूनही ते तिला भेटू शकत नव्हते. अखेर तब्बल 60 दिवसानंतर या बाप-लेकीची प्रत्यक्ष भेट झाली. या वेळी दीपक लांडगे यांना भावना अनावर झाल्या होत्या.

पार्श्वभूमीवर दीपक लांडगे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मी पोलीस विभागात 20 वर्षांपासून कार्यरत आहे. या काळात शहरातील अनेक भागात काम केले असून, अनेक प्रसंग, घडामोडी पाहिल्या आहेत. मात्र आता आपल्यावर ओढावलेल्या सर्वात मोठ्या अशा करोनारुपी संकटाचा माझ्यासह आपण सर्वजण सामना करत आहोत.  ही लढा आपण लवकरच जिंकू, पण त्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाने शासनाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, करोना लढ्यातील अनेक आठवणी आहेत. तशीच एक आठवण आयुष्यभर कायम लक्षात राहणारी म्हणजे, आतापर्यंत  मी, पत्नी सुप्रिया आणि आमचा दहा वर्षांचा हर्षद अस आमचं कुटुंबं होतं. त्यात आता आणखी सदस्याची  भर पडली आहे.  14 एप्रिल रोजी आम्हाला मुलगी झाली. त्यावेळी मी ड्युटीवर असल्याने, मला बाळाला पाहता आले नाही आणि संसर्गाच्या भीतीने मी देखील पाहण्यास गेलो नाही. बाळाला त्रास नको, म्हणून सुप्रिया तिच्या आई-वडिलांकडेच राहत होती. तेव्हापासून 24 मे पर्यंत केवळ व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बाळाला पाहिले आणि तिच्या सोबत संवाद साधला. एका बाजूला मुलगी झाल्याचा आनंद, तर दुसर्‍या बाजूला भेटता येत नसल्याने वाईट वाटत होते. पण अखेर 24 तारखेला बाळाची भेट झाली, हे सांगताना त्यांच्या चेहर्‍यावर आनंद आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. माझ्या आयुष्यात आनंद क्षण आल्याने मुलीचे नाव आनंदी ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील तीन महिन्याच्या काळात करोना विषाणूच्या विरोधात लढणारे अनेक योद्धे पाहिले. पण आपल्या चिमुकली पासून तब्बल 60 दिवस दूर राहणार खाकीतील योद्धा हा कदाचित पहिलाच असावा, या खाकीतील योद्धयास लोकसत्ता ऑनलाईनचा सलाम !