राज्यातील करोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्यातील जनतेला एक सूचक इशारा दिल्याचं दिसून आलं. राज्यात जर ७०० मेट्रीक टन पेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं अजित पवार यांनी बोलून दाखवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, “करोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच घेतात. त्याच्याबाबतची नियमावली मंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. परंतु रूग्ण संख्या वाढत आहे, बहुतेक जण घरीच थांबून उपाचार घेत आहेत. त्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे. परंतु, हे सगळं होत असताना उद्या जर ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्याप्रमाणावर सुरू झाली आणि ७०० मेट्रीक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची राज्यात मागणी झाली तर मग मात्र त्या संदर्भात मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

तसेच, पंतप्रधानांच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सध्या भाजपाकडून सुरू असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “प्रत्येक वेळेस बैठक घेतली म्हणजे प्रत्येकाने उपस्थित राहीलं पाहिजे असं नाही. कधी कोणाला अडचण असते, कधी कोण करोनामुळे विलगिकरणात असतं किंवा आणखी काही कारण असतं. त्याबद्दल स्वत: मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जे नेहमी मुख्यमंत्र्यासोबत अशा बैठकीस असतात याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे संबंधित सल्लागार, सचिव अन्य महत्वाची लोक या बैठकीला हजर होते. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती की आपल्याकडे लस तुटवडा आहे, १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देताना लस तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे तशा पद्धतीची बैठकीत मागणी झाली. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही. राज्याच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अतिशय व्यवस्थित सुरू आहे. आम्ही सगळेच जण त्यांचे सहकारी या नात्याने एक टीम म्हणून काम करत आहोत. अधिकारी देखील काम करत आहेत. मुख्यमंत्री देखील दररोज आढावा घेत आहेत.”

याचबरोबर, पुणे जिल्ह्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ठरवण्यासाठी आमची बैठक झाली. आम्ही अनेकजण राज्याचं, जिल्ह्याचं, तालुक्यांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे काय कोणाच्या मनात आहे, हे जाणून घेण्यासाठी मी, दिलीप वळसे पाटील, दत्ताभाऊ भरणे, संजय जगताप, काँग्रेसचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे इथले अध्यक्ष अशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. सगळ्याचं ऐकून घेतलं आणि त्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलं. पण शेवटी मी आणि दिलीप वळसे पाटील या संदर्भातील निर्णय जो निर्णय घेऊ तो मान्य असेल असंही त्यांनी सांगितलं. मी आता बैठकीलाच चाललो आहे, तिथे गेल्यानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे फॉर्म भरले जातील आणि ते बिनविरोध निवडून येतील. अशी देखील यावेळी अजित पवार यांनी माहिती दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus then the cm can take tough decisions ajit pawars statement msr
First published on: 15-01-2022 at 12:46 IST