राज्य शासनाने केलेल्या सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी बुधवार (१ जुलै) पासून शहरात सुरू होत असून नागरिकांना विविध सेवा आणि सुविधा विशिष्ट कालावधीत देण्याचे बंधन या कायद्यात असल्यामुळे महापालिका प्रशासनाला आता या कायद्यानुसार सेवा-सुविधा निर्धारित वेळेतच द्याव्या लागणार आहेत.
सेवा हमी कायद्यात कोणकोणत्या सेवा, किती कालावधीत महापालिकेने द्यायच्या आहेत, तसेच त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे शासनाने जाहीर केले असून, या सेवा देण्यासाठीचे शुल्क महापालिकेने निश्चित करायचे आहे. शासनाच्या या आदेशानुसार नागरिकांना जन्म दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता कर उतारा, झोन दाखला, थकबाकी नसल्याचा दाखला, नळजोडणी, बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्र, जोते तपासणी प्रमाणपत्र आदी सुविधा विशिष्ट कालावधीत आता उपलब्ध होणार आहेत. राज्यात सत्तेवर आल्यानंतर हा कायदा लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. कायद्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होत आहे.
या कायद्यातील तरतुदीनुसार नवीन नळजोड नागरिकांना पंधरा दिवसांत दिला जाणार आहे. शहरातील अनधिकृत नळजोड कायम करण्याचा निर्णय गेल्या पंधरवडय़ातच महापालिकेच्या मुख्य सभेत घेण्यात आला होता. शहरात एक लाख अनधिकृत नळजोड असल्याची माहिती त्या वेळी पुढे आली होती. महापालिकेकडे नळजोडासाठी अर्ज केल्यानंतर वेगवेगळी कागदपत्रे मागवली जातात. तसेच सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतरही नळजोड मिळत नाही, अशा तक्रारी सभेत करण्यात आल्या होत्या. अर्ज करूनही नळजोड मिळत नसल्यामुळे नागरिक अनधिकृत नळजोड घेतात. त्यामुळे अनधिकृत नळजोड कायम करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली जाणार असून, त्या कालावधीत शुल्क भरून हे नळजोड नागरिकांनी नियमित करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे अनधिकृत नळजोड आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
विहित नमुन्यातील अर्ज, वास्तुविशारदाचा दाखला तसेच मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकाम आराखडा वगैरे गोष्टी सादर केल्यानंतर महापालिकेने बांधकाम परवानगी साठ दिवसांत द्यायची असून, भोगवटा प्रमाणपत्रही तीस दिवसांत उपलब्ध होणार आहे. तसेच जोते तपासणीसाठी संबंधिताने अर्ज केल्यानंतर जोते तपासणीचा दाखला पंधरा दिवसांत मिळणार आहे.
नव्या नळजोडाबाबतची माहिती देताना महापालिकेचे अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा विभाग) व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले, की नळजोडाचे अर्ज करण्यासाठी शहराचे तीन विभाग करण्यात आले असून आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज केल्यास नवीन नळजोड देण्याची कार्यवाही पंधरा दिवसांत केली जाते. तशाच पद्धतीची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार असून प्रशासनाकडून नवीन नळजोड पंधरा दिवसांत दिले जातील.