सायकल मार्ग उखडला, तरीही महापालिकेकडून पाठराखण

पुणे : सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शहराच्या विविध भागात सायकल मार्ग विकसित करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असतानाच मुजोरी करत नगरसेवक योगेश ससाणे यांनी सायकल मार्गच उखडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारानंतरही महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकाची पाठराखण करण्यात आली आहे.

वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचा दावा करत पुणे सोलापूर बीआरटी लगतचा सायकल मार्ग उखडल्याचे जाहीर केल्यानंतरही तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नगरसेवकाकडून नुकसान झाले असतानाही महापालिका प्रशासनाकडून हा प्रकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच महापालिकेच्या पथ विभागाकडून ‘अज्ञात’ व्यक्तीविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

सोळा वर्षांपूर्वी महापालिकेने स्वारगेट ते हडपसर या आठ किलोमीटर लांबीच्या अंतरात बीआरटी मार्ग प्रायोगिक तत्त्वावर विकसित केला. बीआरटी मार्ग उभारणीच्या निकषाप्रमाणे बीआरटी मार्गालगत सायकल मार्ग तयार करण्यात आला. सायकल मार्गामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला आणि कामधेनू सोसायटी समोरील सायकल मार्ग काढावा, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत होती.

सायकल मार्गाचा वापर होत नसल्याचा दावा स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे नगरसेवक योगेश ससाणे यांनी जेसीबीच्या साहाय्याने हा मार्ग उखडून टाकला. दोनशे मीटर लांबीचा मार्ग जेसीबीने उखडण्यात आला. या प्रकारानंतर महापालिकेने केवळ जुजबी कारवाई करत नगरसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सायकल मार्ग उखडल्यानंतर नगरसेवक ससाणे यांनी त्याची कबुली दिली आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून अज्ञात व्यक्तीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र नाव माहिती झाल्यानंतरही आणि सार्वजनिक मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असतानाही प्रशासनाकडून सुधारित तक्रार देण्यात आलेली नाही. दरम्यान, सायकल मार्ग नव्याने बांधण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पथ विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी वाहतूक सुधारणेच्या नावाखाली बीआरटी मार्गातील दुभाजक काढण्यात आले होते. तसेच पदपथांची रुंदी कमी करून रस्ता मोठा करण्याचा प्रयत्न झाला होता. आताही सायकल मार्ग उखडण्यात आला असला तरी वाहतूक कोंडी सुटणार का, हा मूळ प्रश्न मात्र कायम राहणार आहे.

सायकल मार्गामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. सायकल मार्ग काढावा, यासाठी सातत्याने पथ विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्याबाबत निवेदनेही देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मार्ग उखडून टाकण्यात आला.  – योगेश ससाणे, नगरसेवक

सायकल मार्ग उखडल्याचे समजल्यानंतर हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची सूचना दिली. अधिकाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार कळला तेव्हा नाव पुढे आले नव्हते.  – व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग, महापालिका