पुणे : अपुरा पाणीपुरवठा, अशुद्ध पाण्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार या वेळी सभासदांनी केली. त्यावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांबरोबर अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावेत, असे आदेश महापाैर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले.

महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा महापालिकेच्या सभागृहात पार पडली. सभेला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेविका प्रिया गदादे यांनी जनता वसाहतमधील ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या वाहिन्यांबाबत प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारला. मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजची वाहिनी खराब झाल्याने त्यामधून घाण पाणी रस्त्यावर येते, याकडे गदादे यांनी लक्ष वेधले. रमजानचा महिना सुरू होत असताना कोंढवा, महंमदवाडी भागातील नागरिकांना गेल्या १५ दिवसांपासून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची तक्रार या भागातील नगरसेवकांनी केली.

‘महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा अत्यंत अपुरा आणि कमी दाबाने होत आहे. पाण्याच्या टाक्या पुरेशा भरत नसल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही समाविष्ट गावांमध्ये प्रतिव्यक्ती दहा लीटरही पाणी मिळत नाही. या भागांतील नागरिकांना अर्धा ते एक तास तरी पुरेशा दाबाने पाणी दिले पाहिजे. मात्र, महापालिका प्रशासन केवळ कारणे देते. पाणी मिळत नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, सोसायट्यांना टँकरवर खर्च करावा लागतो,’ अशी तक्रार सभासदांनी केली.

‘पिण्याच्या पाण्यामध्ये सर्रासपणे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक भागांतील नागरिकांना जुलाब, उलटी अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता आदेश देतात. मात्र, कनिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात,’ याकडेही नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, राष्ट्रवादीचे हाजी गफूर पठाण, सुरज लोखंडे, काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांच्यासह भाजपचे प्रसन्न जगताप, हरिदास चरवड, प्राची आल्हाट, दिलीप वेडे पाटील, यांनी सभागृहात गाऱ्हाणे मांडले.

‘सभासदांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक सभासदाच्या तक्रारीची दखल घ्यावी. क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांबरोबर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावेत. तसेच, ज्या भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, त्यामध्ये सुधारणा करावी,’ असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले.