“आता आम्ही पॉलिसी डिसीजन घेतला आहे. स्थानिक स्तरावर स्वबळावर लढ्याचे, आता त्याचा वारंवार उच्चार करायची गरज नाही. मात्र पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी अंतर्गत आलेला पैसा कशा प्रकारे लुटण्यात आला आहे. ते आपण सर्वांनी पाहिले आहे. सत्तेच्या नावाखाली भ्रष्टाचार करणे हा भाजपचा धंदा आहे. त्यामुळे पुणे शहराची लोक हे सर्व ओळखून आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पुण्यातील जनता पुणे महापालिकेत काँग्रेसला स्थान देतील,” असा विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले असताना. त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपाला घरी बसविण्याच्या दृष्टीने काय रणनीती असणार आहे, यावर भूमिका मांडली.

पंतप्रधानांनी पाकिस्तानसह जगातील १७ देशांना लस पाठवली

“जागतिक आरोग्य संघटनेकडून ऑक्टोबर महिन्यात सांगण्यात आले होते की, भारताला करोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका निर्माण होणार आहे. मात्र आपल्या पंतप्रधानांनी पाकिस्तानसह जगातील १७ देशांना लस पाठवली. ज्या देशाने पुलवामासारखी घटना घडविली. त्यामध्ये आमचे सैनिक शहीद झाले, अशा शत्रू देशाला मोफत लस दिली गेली. पण हीच लस आपल्या देशातील जनतेला द्यायला पाहिजे होती. मात्र तसे काही झाले नाही. त्या बाबत योग्य नियोजन करायला पाहिजे होते. त्यामुळे अनेक नागरिकाचे जीव वाचले असते आणि गंगा नदीत प्रेत वाहताना दिसले नसते,” अशा शब्दात नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.