भाजपची पुणे महापालिकेमध्ये सत्ता असताना हजारो कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्याची कॅग मार्फत चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आज(मंळवार) आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी सचिन अहिर म्हणाले की, “स्मार्ट सिटीसह अन्य कामांची बिलं काम न करता काढण्यात आली आहेत. यामुळे पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असणार आहे. म्हणून पुणे महापालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करणार आहोत. त्यामधून सत्य परिस्थिती समोर येईल. तसेच, आमच्या मागणीची दखल न घेतल्यास येत्या काळात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दसरा मेळावा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच होणार –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा. असे विधान आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. त्यावर सचिन अहिर म्हणाले की, “काय ती झाडी काय ते हॉटेल तेवढच त्यांनी बघ्याच राहिले आहे. पण ते देखील याच व्यवस्थेचे भाग राहिले होते. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली दसरा मेळावा झाला आहे. त्यामुळे कोणी किती ही दावे केले तरी मेळावा हा शिवसेनेचाच होणार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार.”