देशासमोर विश्वासार्हतेचे संकट आहे. अशा परिस्थितीत देशाला विकसित करू शकेल असा आशेचा किरण जनतेला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने दिसत आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
मोरया प्रकाशनतर्फे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेल्या ‘मोदीच का?’ या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. भाजप प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, शहराध्यक्ष अनिल शिरोळे आणि प्रकाशक दिलीप महाजन या वेळी व्यासपीठावर होते.
फडणवीस म्हणाले, पाच वर्षांच्या अराजकतेने मोदीच का हा प्रश्न उपस्थित केला आहे. राजकारणामध्ये महत्त्वाचा पर्याय उभा रहात नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही. मोदींविषयी ही आशा लोकांना वाटत आहे. मोदींच्या विरोधातील प्रचाराची उत्तरे या पुस्तकामध्ये आहेत. गोध्राच्या दंगलीची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित करणाऱ काँग्रेसने गुजरातमधील १९६५ च्या दंगलीची जबाबदारी कोणाची याचे उत्तर द्यावे. मोदी यांना दोषी ठरविण्यासाठी काँग्रसने ‘सुपारी’ दिली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष तपास पथकाला त्यासंदर्भातील एकही पुरावा आढळला नाही. देशामध्ये काँग्रेस हा एकमेव जातीयवादी पक्ष आहे.
भंडारी म्हणाले, कोणतीही दंगल वाईटच असते. कोणाही संवेदनशील माणूस दंगलीचे समर्थन करणार नाही. मात्र, गुजरातमधील दंगलीबाबत ओरड करणाऱ्यांना काश्मिर आणि आसाममधील दंगल दिसत नाही. १९४७ पासूनच्या दंगलीत किती दगावले याचा हिशेब मांडला जात नाही. काँग्रेसच्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटत असून विद्रुप चेहरा समोर येऊ लागला आहे.
भाऊ तोरसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. महाजन यांनी प्रास्ताविक केले. गौरी देव यांनी सूत्रसंचालन केले.