अपघातात मृत्यू झालेले जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रताप पाटील यांची पत्नी, मुले आणि आई-वडिलांना २२ लाख ४३ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने विमा कंपनीला दिला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या वारसाचे नातेवाईक त्यांच्यासोबत राहत नसले, तरी त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते, असे न्यायाधिकरणाने आपल्या निकालात म्हटले आहे.
पाटील हे २४ जुलै २००७ रोजी सकाळी कोथरूड येथे फिरण्यासाठी गेले होते. त्या वेळी गुरु गणेशनगर या ठिकाणी त्यांना एका मोटारीने धडक दिली होती. ही मोटार सुधीर उजलांबर यांच्या नावावर होती. त्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून विमा उतरवला होता. या प्रकरणी पाटील यांची पत्नी आणि त्यांच्या आई-वडिलांनी नुकसान भरपाईसाठी दोन वेगवेगळे दावे मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे दाखल केले होते. या दोन्ही दाव्यात न्यायाधिकरणाने २२ लाख ४३ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. यातील साठ टक्के रक्कम पत्नी व प्रत्येकी दहा टक्के नुकसान भरपाई दोन मुले, आई-वडिलांना देण्याचा आदेश दिला. हा आदेश देताना पालक मुलांसोबत राहत नाहीत, म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येऊ नये, हे कारण देणे न पटणारे आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.