पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सूरज गोसावीला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गोसावी याच्या शारीरिक सक्षमतेची तपासणी केली जाणार असून, डीएनए चाचणीसाठी रक्त, नखे, केस आदी नमुने घेतले जाणार आहेत. गोसावी गेले साडेसहा महिने फरारी होता. त्याला कोणी आश्रय दिला, यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जाणार असल्याची माहिती रविवारी न्यायालयात देण्यात आली.
बोपदेव घाटात ३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री महाविद्यालयीन तरुणी मित्राबरोबर फिरायला गेली होती. बोपदेव घाटातील टेबल पाॅइंट परिसरात आरोपी चंद्रशेखर रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. होले वस्ती, उंड्री), अख्तर अली शेख (२८, रा. आदर्शनगर, मंतरवाडी, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश), आरोपी बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावी (वय ३३, रा. दीपनगर, काटेवाडी, बारामती) यांनी तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला मारहाण केली. दोघांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील चीजवस्तू काढून घेतल्या. त्यानंतर तिघांनी कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख आणि कनोजिया यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनेे अटक केली होती. गोसावी पसार झाला होता. गेले साडेसहा महिने पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता.
वालचंदनगर पोलिसांनी त्याला अकलूज एसटी स्थानक परिसरातून शनिवारी (२६ एप्रिल) दुपारी अटक केली. गोसावी याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गोसावी आणि साथीदारांनी घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेले शस्त्र, लुटलेले दागिने, गुन्हा करताना घातलेले कपडे जप्त करायचे आहेत. आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर यांनी युक्तिवादात केली.
न्यायालयाने गोसावीला २ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी शेख, कनोजिया यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेने ५०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींनी तरुणीला धमकावून लुटलेली सोनसाखळी, धमकावण्यासाठी वापरलेला कोयता, काठी, आरोपींचे कपडे आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.