सिंहगड रस्ता परिसरात करोनाबाधितांची वाढती संख्या; रुग्णांची गैरसोय
पुणे : धायरीतील कै . मुरलीधर लायगुडे रुग्णालयात प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा कार्यान्वित करण्यात महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे. सिंहगड रस्ता परिसरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना अत्यावश्यक सेवा महापालिके ला महिना होत आला तरी सुरू करता आलेली नाही. याउलट रुग्णालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाच ते सहा लाख रुपये खर्च करून सुरक्षा भिंत आणि सिमेंटचा रस्ता करण्यास तातडीने प्रशासकीय मान्यता घेऊन कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका सिंहगड रस्ता परिसरातील शेकडो करोनाबाधित रुग्णांना बसत असून रुग्णांची गैरसोय होत आहे.
शहरात करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम धायरी येथील मुरलीधर लायगुडे रुग्णालयात करोना काळजी के ंद्र सुरू करण्यात आले. या रुग्णालयाची क्षमता ६० खाटांची आहे. त्यामुळे या रुग्णालयात प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात पहिल्या मजल्यावर ३० खाटा कार्यान्वित करण्यासाठीची प्रक्रिया महापालिके च्या विद्युत विभागाकडून राबविण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांची पाहणी दौरेही झाले मात्र महिना झाला तरी ही सुविधा कार्यान्वित झालेली नसल्याचे वस्तुस्थिती आहे. १ आक्टोबरपासून पहिला मजल्यावरील ३० खाटांची सुविधा सुरू होईल, असा दावा सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, मुख्य आरोग्य विभाग आणि विद्युत विभागाकडून करण्यात आला होता. विभाग सुरू नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून प्राणवायू सुविधांच्या खाटांसाठी रुग्णांना शहराच्या अन्य भागातील रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे.
एका बाजूला अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यास दिरंगाई होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र खर्चाला सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने तत्परता दाखविली असल्याची वस्तुस्थिती आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसावेळी रुग्णालयाच्या परिसरात साप आढळून आला. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णालयाभोवती सीमाभिंत आणि रुग्णालयात येण्यासाठी सिमेंटचा रस्ता करण्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून निश्चित करण्यात आले आणि खर्चाच्या या कामाला सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडूनही त्वरित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. रुग्णालयाकडून पाच ते सहा लाख रुपये खर्च करून हे काम अवघ्या काही दिवसांत पूर्ण करण्यात आले. खर्चाच्या कामाला प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मात्र अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास दिरंगाई होत असल्याचा प्रकारही या निमित्ताने पुढे आला आहे.
दरम्यान, या संदर्भात महापालिके च्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कं दूल यांच्याशी संपर्क साधला असता विद्युत विभागाची कामे पूर्ण झाली आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्राणवायूच्या खाटा सुरू करण्यास मनुष्यबळाची कमरता जाणवत असल्याचे सांगण्यात आले.
सिंहगड रस्ता परिसरासाठी लायगुडे रुग्णालय महत्त्वाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात करोना काळजी केंद्रांबरोबरच संशयित रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्याची (आरटी-पीसीआर टेस्ट) सुविधा होती. तसेच टप्प्याटप्प्याने दोन मजल्यांवर मिळून प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा कार्यान्वित करण्यात येणार होत्या. मात्र क्षेत्रीय कार्यालयाकडून नमुना चाचणी केंद्र (स्वॅब सेंटर) तडकाफडकी बंद करण्यात आले. त्याचा फटका शेकडो रुग्णांना बसला होता. रुग्णालयातील केंद्र बंद
करण्याचा निर्णय, मनुष्यबळ स्थलांतरित करून रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घातलेला घाट, त्यातून रुग्णांची होत असलेली गैरसोय या संदर्भात ‘लोकसत्ता’ने सप्टेंबर महिन्यात वृत्तमालिका प्रकाशित के ली होती. त्यानंतर चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. सध्या पु. ल. देशपांडे उद्यानातील केंद्र, लायगुडे रुग्णालय आणि पोकळे शाळा येथे चाचण्या होत आहेत.
रुग्णालयातील ही सुविधा सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुविधेची तपासणी प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत रुग्णालयातील हा विभाग सुरू करण्यात येईल.
– संभाजी खोत, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय.
