लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच शहरातील विस्तार वाढल्याने नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याचे सूतोवाच पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यानुसार पुण्यात सात नवीन पोलीस ठाणे, तसेच पिंपरी पोलीस आयुक्तालयात चार पोलीस ठाणी सुरु करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर पोलीस ठाणे निर्मितीला गती मिळणार आहे.

चाकण येथील एका कार्यक्रमात गुरुवारी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने अकरा पोलीस ठाणी सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली. पवार यांच्या घोषणेनंतर नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा रखडलेल्या प्रस्तावास गती मिळणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू

पुणे पोलीस आयुक्तयालाय आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, फुरसुंगी, काळेपडळ ही सात नवीन पोलीस ठाणी प्रस्तावित आहेत. भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, चतु:शृंगी, लोणी काळभोर, लाेणीकंद, हडपसर, वानवडी, कोंढवा या पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. गृहविभागाने पुण्यात सात नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीस परवानगी दिली आहे. प्रस्तावित पोलीस ठाण्यांच्या निर्मितीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पोलीस ठाण्यांसाठी जागा निश्चिती करण्यात आली आहे. मनुष्यबळ, आर्थिक निधीच्या तरतुदीअभावी पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावर रखडलेला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव मार्गी लागण्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>>मोक्का कारवाईनंतर पसार झालेला सराइत गजाआड

नवीन पोलीस ठाण्यांची आवश्यकता का ?

पुणे पोलीस आयुक्तयालयात ३२ पोलीस ठाणी आहेत. पाेलीस ठाणेनिहाय शहरात पाच परिमंडळ आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारी घटना वाढत आहेत. शहराचा विस्तार वाढत असून, समाविष्ट गावांचा समावेश पोलीस आयुक्यालयात करण्यात आला आहे. शहराचा विस्तार विचारात घेऊन नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे. सात नवीन पोलीस ठाणी सुरू झाल्यानंतर पोलीस आयुक्तयालायात ३९ पोलीस ठाण्यांचा समावेश होईल. पुणे शहर, परिसरात नोकरी, रोजगाराच्या शोधात परगावातून मोठ्या संख्येने नागरिक स्थायिक होत आहेत. पोलीस यंत्रणेवर ताण पडत असू, कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे. पुणे शहराचा विस्तार मुंबईपेक्षा मोठा आहे.

पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाणी सुरु करण्यचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता. याबाबत गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. संबंधित प्रस्ताव अंतिम टप्यात आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू हाेण्यापूर्वी प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता आहे.- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त