सृजनशीलतेचा अभाव असलेले सध्याचे संगीत निव्वळ यांत्रिक झाले आहे. त्यामुळे या नव्या संगीतातील माधुर्य हरवले आहे, अशी खंत व्यक्त करतानाच ज्यांना स्वत:चा ‘सा’ सापडत नाही ते संगीतकार कोणत्या दर्जाचे संगीत देणार, असा सवाल चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेल्या गोरख शर्मा आणि सुरेश यादव या वादकांनी बुधवारी उपस्थित केला.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल संगीतकार जोडीतील प्यारेलाल यांचे बंधू व मेंडोलिन-गिटारवादक गोरख शर्मा आणि क्लॅरोनेट-सुपॅ्रनिनो सॅक्सोफोनवादक सुरेश यादव यांचा सहभाग असलेला ‘ओरिजिनल आर्टिस्ट ऑफ गोल्डन इरा’ हा कार्यक्रम ‘हार्मनी’ संस्थेतर्फे गुरुवारी (२८ एप्रिल) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रात्री साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने पुण्यात आलेल्या या ज्येष्ठ वादक कलाकारांनी दिलखुलास संवाद साधला. प्रसिद्ध निवेदक मंगेश वाघमारे आणि मकरंद पाटणकर या वेळी उपस्थित होते.
वडील पं. रामप्रसाद शर्मा यांच्यामुळे घरामध्ये संगीताचा वारसा लाभला. बालवयातच वडिलांनी मेंडोलिन हातामध्ये दिले. वयाच्या १४ व्या वर्षी मी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘छैला बाबू’ चित्रपटासाठी वादन केले. मात्र, आधी प्रदर्शित झालेला ‘पारसमणी’ हा या जोडीचा पहिला चित्रपट ठरला. केवळ लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासमवेतच नाही तर, चित्रपटसृष्टीतील सर्व आघाडीच्या संगीतकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, असे सांगून गोरख शर्मा यांनी हनीमल कॅस्ट्रो यांच्याकडे गिटारवादनाचे शिक्षण घेतल्याचे सांगितले. वादक कलाकार म्हणूनच मी कामामध्ये इतका व्यग्र होतो की स्वतंत्ररीत्या संगीतकार व्हावे असे कधी वाटलेच नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘नाविका रे’, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘मी डोलकर डोलकर’ या गीतांमधील क्लॅरोनेटवादन हे सुरेश यादव यांचे खास वैशिष्टय़. शाहीर साबळे पार्टीमधील कलाकार असल्यामुळे देवदत्त साबळे यांच्या ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ आणि ‘ही चाल तुरुतुरु’ या गीतांचे संगीत संयोजन मी केले होते असे सांगून यादव म्हणाले, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे काम करताना दररोज परीक्षेला सामोरे जावे लागत असे. माझा संगीतामध्ये कोणी गुरू नसला तरी प्यारेलाल यांना मी मानसगुरू मानतो.
जाणकार संगीतकारांमुळे वादकांचाही कस लागायचा
क्लॅरोनेटवादन करताना एका गीतामध्ये मी कोमल धैवताचा सूर लावला होता. त्याला आक्षेप घेत सी. रामचंद्र यांनी हे तू कसे वाजविलेस असे मला विचारले. ‘अण्णा, हे आवडले नाही तर अवश्य काढून टाका,’ अशी विनंती मी त्यांना केली होती. अखेर अण्णांनी ते सूर गीतामध्ये तसेच ठेवले. ही आठवण सांगून सुरेश यादव यांनी जाणकार संगीतकारांबरोबर काम करताना वादक म्हणून आम्हा सर्वाचा कस लागायचा, असे सांगितले.