पुणे : पुण्यातील घराची खरेदी आता कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) मदतीने सोपी होणार आहे. ‘क्रेडाई पुणे’ने एआय-आधारित मालमत्ता शोध मंच ‘क्रेडाईबिलिटी डॉट एआय’ हा सादर केला आहे. त्यात मोबाइल उपयोजनाद्वारे (ॲप) पुण्यातील घरांचा शोध सहजपणे घेता येणार आहे. याचबरोबर विकासक आणि ग्राहक यांच्यात अधिक पारदर्शी व्यवहार होण्यास मदत होणार आहे.
क्रेडाई पुणेच्या सर्वसाधारण सभेत हे उपयोजन सादर करण्यात आले. सध्या यावर चारशेहून अधिक प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली असून, लवकरच ही संख्या आठशेपेक्षा अधिक प्रकल्पांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बदलत्या काळानुसार एआय आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर या उपयोजनामध्ये एआय-आधारित आणखी सुविधाही उपलब्ध होणार आहेत. त्यात बाजारपेठेतील घडामोडी आणि घरखरेदीदारांसाठी सहायक साधने यांचा समावेश आहे. या उपयोजनामध्ये सोप्या भाषेत शोध घेण्याची सुविधा आहे.
अनेक मालमत्ता संकेतस्थळावर आढळणाऱ्या घरांच्या बनावट नोंदी, एकाच प्रकल्पाच्या अनेक नोंदी, स्पॅम कॉल्स आणि विदेचा गैरवापर यांसारख्या समस्यांवर या मंचामुळे नियंत्रण मिळते. तसेच, एकाच प्रकल्पाची वेगवेगळ्या विक्री प्रतिनिधींकडून होणारी पुनरावृत्ती टाळल्यामुळे ग्राहकांची गोंधळाची शक्यता कमी होते. या मंचावर केवळ क्रेडाई पुणेच्या पडताळणी झालेल्या सदस्य विकासकांचे प्रकल्प दाखवले जातील. प्रत्येक प्रकल्पाची अधिकृत आणि एकमेव नोंद थेट विकासकाकडूनच केली जात आहे.
या मंचामुळे मालमत्ता शोध प्रक्रियेतील अनावश्यक दुवे कमी होतात. त्यामुळे ग्राहकांना थेट विकासकाकडून अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळते. ग्राहकांना केले जाणारे अनावश्यक कॉल टाळले जातील, अशी या मंचाची रचना करण्यात आली आहे. यात ग्राहकांसाठी अधिक सुरक्षित आणि गोपनीयता जपणारा संवादाचा पर्याय उपलब्ध आहे.
अलीकडच्या काळात मालमत्ता विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर बनावट नोंदी, एकाच प्रकल्पाच्या अनेक नोंदी, स्पॅम कॉल आणि विदेचा गैरवापर याबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. ग्राहकांनी आपली माहिती ऑनलाइन दिल्यानंतर त्यांना अनावश्यक कॉल करण्यात येतात. दुसरीकडे विकासकांनाही विपणन खर्च जास्त करावा लागतो आणि त्याचा परिणाम शेवटी ग्राहकांवर होतो. या सर्व अडचणींवर ‘क्रेडाईबिलिटी डॉट एआय’ मंचामुळे मात करता येईल.- मनीष जैन, अध्यक्ष, क्रेडाई पुणे</p>
