पुणे : बेहिशेबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागातील उपायुक्त विजय लांडगे यांच्यासह पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लांडगे दाम्पत्याच्या पुणे शहरातील चार तसेच नाशिकमधील एक अशा पाच मालमत्तांची झडती घेण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

बेहिशेबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी आकाशचिन्ह विभागातील उपायुक्त विजय भास्कर लांडगे (वय ४९), त्यांची पत्नी शुभेच्छा (वय ४३) यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एसीबी’चे पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. लांडगे यांनी त्यांची पत्नीच्या नावे एक कोटी २ लाख ६० हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘एसीबी’कडून करणात आलेल्या तपासात लांडगे यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा अतिरिक्त ३१ टक्के बेहिशेबी मालमत्ता पत्नीच्या नावावर खरेदी केल्याचे चौकशीत उघड झाले. पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.