पुणे : शहरातून तडीपार केल्यानंतर बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अविनाश उर्फ ताऊ अर्जुन जोगन (वय २८, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणे, तसेच दहशत माजविल्या प्रकणी जोगन याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोगन याला परिमंडळ दोनच्या पाेलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातून १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर तो शहरात अला होता. बिबवेवाडीतील शेळके वस्तीत कोयता उगारून त्याने दहशत माजविल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याचा शोधून घेऊन ताब्यात घेण्यात आले.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे, उपनिरीक्षक अमोल भुवड, संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमीत ताकपेरे, रक्षित काळे यांनी ही कारवाई केली.
शहरात दहशत माजविणाऱ्या गुंडांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तडीपार केल्यानंतर काही सराइत आदेशाचा भंग करुन शहरात वास्तव्य करत असल्याचे दिसून आले आहे. आदेशाचा भंग करुन शहरात वावरणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तडीपार केलेला सराईत शहरात आढळून आल्यास किंवा दहशत माजविल्याचा प्रकार दिसून आल्यास त्वरीत नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सोलापूर रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न
तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर घडली. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली.
गणेश नवनाथ कांबळे (वय ३३, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कुणाल राहुल चौगुले (वय १८), सुरेश बाबुराव गायकवाड (वय १८, दाेघे रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत कांबळे याने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास द्राक्ष संशोधन परिषदेसमोर मालवाहू टेम्पोचे चाक बदलण्याचे काम करत होते. त्या वेळी आरोपी दुचाकीवरुन तेथे आले. काही कारण नसताना आरोपींनी शिवीगाळ करुन कांबळे यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत ते जखमी झाले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन चौगुले आणि गायकवाड यांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोेणे तपास करत आहेत.
