अवघ्या सव्वा वर्षांच्या मुलाला आयानेच मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेबी लक्ष्मण पाटोळे (वय ४२, रा. रामटेकडी, हडपसर) या महिलेला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात मुलाची आई टी. वसंता यांनी तक्रार दिली आहे. वसंता आणि त्यांचे पती नवीनकुमार हे दोघेही मूळचे केरळमधील आहेत. सध्या ते नऱ्हे येथे राहत असून िहजवडी येथील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करतात. ते दोघेही नोकरीस असल्यामुळे हेमिशकुमार या १४ महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी विश्रांतवाडी येथील एका एजन्सीशी संपर्क साधला. या एजन्सीमार्फत आठ दिवसांपूर्वी बेबी पाटोळे ही त्यांच्याकडे केअरटेकर म्हणून कामासाठी आली. ७ मे रोजी रात्रपाळी असल्यामुळे हे दांपत्य कामावर होते. बाळाची चौकशी करण्यासाठी नवीनकुमार यांनी घरी दूरध्वनी केला. मात्र, तो उचलला गेला नाही. दरम्यान, रात्री बाळ रडू लागल्याने चिडलेल्या पाटोळे हिने त्यास मारहाण करीत गादी आणि बीन बॅगवर आपटले. पाटोळेचे हे कृत्य घरातील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले. नवीनकुमार यांनी सीसीटीव्हीतील फूटेज पाहिले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बाल न्याय अधिनियम २३ अनुसार पाटोळेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केल्याचे दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, सांभाळ करणाऱ्या महिलेनेच बालकाला मारहाण करण्याचा क्रूरपणा केल्याच्या घटनेचा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निषेध केला आहे. बालक अधिकार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, असे आपण अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या घटनेमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.