पुणे : गर्भवती महिला तनिषा भिसे हिच्यावर वेळेत उपचार न केल्याच्या आरोपावरुन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डाॅ. सुश्रूत घैसास यांच्याविरुद्ध वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरुन अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ससून रुग्णालयातील समितीने याबाबत पुणे पोलिसांना शनिवारी दुपारी अहवाल सादर केल्यानंतर डाॅ. घैसास यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा किंवा हलगर्जी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती तनिषा उर्फ ईश्वरी भिसे यांच्यावर तातडीने उपचार न करता. पैशांची मागणी करण्यात आली. उपचार न करता त्यांना साडेपाच तास ताटकळत ठेवण्यात आले. असंवदेनशीलपणाचे हे कृत्य असून, वैद्यकीय निष्काळजीपणाचा (मेडीकल निग्लिजन्स) ठपका ठेवून डाॅ. घैसास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबत भिसे यांची नणंद प्रियंका अक्षय ताटे (वय २६, रा. विश्रांतवाडी) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, असे पोलीस उपायुक्त कदम यांनी सांगितले.
मंगेशकर रुग्णालयातील डाॅ. घैसास यांना तनिषा भिसे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती होती. त्यांनी पैशांसाठी आम्हाला वेठीस धरले. साडेपाच तास ताटकळत ठेवण्यात आले. तातडीने उपचार (गोल्डन अवर ट्रिटमेंट) केले नाहीत. उपचारात दिरंगाई, तसेच निष्काळजीपणा दाखविल्याने तनिषा यांचा मृत्यू झाल्याचे नणंद प्रियंका लाटे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
तनिषा यांना प्रसृतीसाठी मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डाॅ. घैसास यांनी त्यांची तपासणी केली. तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल. प्रसृतीनंतर नवजात अर्भकांना काचेच्या पेटीत ठेवावे लागेल. त्यासाठी २० लाख रुपये खर्च येईल. तातडीने दहा लाख रुपये आगाऊ भरावे लागतील, असे डाॅ. घैसास यांनी सांगितले होते. भिसे कुटुंबीयांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शविली होती. दहा लाख रुपये भरल्याशिवाय रुग्णालयात दाखल करुन घेता येणार नाही, असे सांगून उपचार सुरू करण्यात आले नाहीत. शस्त्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली नाही. साडेपाच तास ताटकळत ठेवण्यात आले. गावाकडील जमीन विक्री करुन पैसे भरतो, अशी विनंती करण्यात आली. मात्र, उपचार सुरू करण्यात आले नाहीत. तनीषा यांना ससून रुग्णालय आणि नंतर वाकड येथील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना बाणेर येथील मणीपाल रुग्णलायात दाखल करण्यात आले. ३१ मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
तनीषा भिसे यांच्या मृ्त्यूनंतर महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. आरोग्य विभागाच्या अहवालात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता. मातामृत्यू अन्वेषण समितीने अहवाल सादर केला होता. धर्मादाय आयुक्त कार्यालायने चौकशी अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर ससून रूग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने पुणे पोलिसांना अहवाल सादर केला. या अहवालात काही बाबी स्पष्ट झाल्या नव्हत्या. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार मुद्दे उपस्थित करुन ससून रूग्णलायातील समितीला पुन्हा अहवाल पाठविण्याची विनंती केली होती. शनिवारी दुपारी याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.
ससून रुग्णालयाच्या समितीने शनिवारी पोलिसांना अहवाल पाठविला. या अहवालात डाॅ. घैसास यांच्याविरुद्ध वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गु्न्हा दाखल केला. कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. – संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन