पुणे : बांधकाम ठेकेदाराकडून सादर केलेले देयक मंजूरी, तसेच कामाची पाहणी करून अहवाल देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता महिलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. तडजोडीत एक लाख ४२ हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने दाेघांना पकडले. याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमंतर्गत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार (वय ५७), दौंड-शिरुर उपविभागातील उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५), कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका बांधकाम ठेकेदाराने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ३७ वर्षीय तरुण शासकीय ठेकेदार आहेत.
दौंड तालुक्यातील खुटबाव रस्ता ते गलांडवाडी पाणंद शिव रस्ता, गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाची निविदा सप्टेंबर २०२४ मध्ये काढण्यात आली होती. तक्रारदार ठेकेदाराला या रस्त्याचे काम मिळाले होते. दोन्ही कामांचे देयक ४० लाख रुपये होते. संबंधित काम पूर्ण केल्यानंतर ३ मार्च रोजी कनिष्ठ अभियंता बगाडे यांनी केलेल्या कामाची पाहणी जिल्हा परिषदेतील समिती (एस.क्यू.एम कमिटी) प्रत्यक्ष करेल. त्यानंतर समितीकडून पाहणी अहवाल सादर करण्यात येईल.
त्यानंतर पाहणी अहवाल, देयक मंजुरीची फाईल तयार करण्यात येईल. त्यासाठी ८० हजार रुपये द्यावे लागतील, असे कनिष्ठ अभियंता बगाडे यांनी ठेकेदाराला सांगितले. त्यानंतर त्यांनी उपअभियंता पठारे, तसेच कार्यकारी अभियंता पवार यांची भेट घेतली. त्यांनी या कामाचे देयक मंजूरी, तसेच प्रत्यक्ष पाहणी अहवाल देण्यासाठी ८० हजार रुपये लाच द्यावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. ११ मार्च रोजी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
तिघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुरुवारी (१३ मार्च) जिल्हा परिषदेच्या आवारात सापळा लावण्यात आला. पवार आणि पठारे यांना लाच घेताना पकडण्यात आले. बगाडे यांनी लाचेची रक्कम पठारे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. पवार, पठारे, बगाडे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करत आहेत.
कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात साडेआठ लाख सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात ही कारवाई केली. या वेळी कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांच्या शासकीय दालनातील एका पिशवीत आठ लाख ५८ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. पथकाने तपासासाठी ही रक्कम जप्त केली असून, याबाबत चौकशी करण्यात येत आहे.