एका वाहिनीवर सुरू असलेल्या गुन्हेगारीविषयक मालिकेवरून सोन्याचे दागिने बनविणाऱ्या व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या नोकराने दागिने लुटण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केला. अपहरणकर्त्यांनी क्लोरोफार्म लावल्याचे या नोकराने पोलिसांना सांगितले होते. पण, हे औषध लावल्यानंतर साधारण पाच तास शुद्ध येत नसताना नोकराने दोन तासातच मालकाला अपहरण झाल्याचे कळविल्यामुळे त्याचा हा बनाव पोलिसांच्या लक्षात आला. अखेर त्याला पोलिसी खाक्या दाखवित फरासखाना पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले ३२ तोळे सोने हस्तगत केले.
जीवराम बगाजी देवाशी (वय २५, रा. राजस्थान) असे स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचणाऱ्या नोकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश रमेश ओसवाल यांचा रविवार पेठेत सोन्याच्या साखळ्या घडविण्याचा व्यवसाय आहे. गेल्या आठ महिन्यांपासून देवाशी त्यांच्याकडे कामाला आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास रमेश ओसवाल यांनी देवाशी याच्याकडे सोन्याच्या अकरा साखळ्या पॉलिश करून आणण्यासाठी दिल्या होत्या. त्या साखळ्या घेऊन गेल्यानंतर बराच वेळ झाला तरी देवाशी आला नाही. म्हणून ओसवाल यांनी देवाशीला फोन केला असता त्याचा फोन बंद होता. सायंकाळी सहाच्या सुमारास ओसवाल यांना एका व्यक्तीने फोन करून तुमचा कामगार संगमवाडी पुलाजवळ चिखलात पडलेला आहे आणि मारहाण झाल्याचे तो सांगत आहे, अशी माहिती दिली. ही माहिती मिळताच ओसवाल आणि त्यांचे भाऊ घटनास्थळी गेले.
ओसवाल यांनी देवाशी याच्याकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, सोन्याच्या साखळ्या पॉलिश केल्यानंतर त्या घेऊन येत असताना रिक्षातून आलेल्या तीन व्यक्तींनी माझ्या तोंडाला रुमाल लावून मारहाण करीत मला रिक्षात जबरदस्तीने बसविले. शुद्धीवर आल्यानंतर या ठिकाणी असल्याचे दिसले. सोन्याच्या साखळ्या खिशात ठेवल्या होत्या. पण, त्यांनी त्या काढून घेतल्या. ओसवाल यांनी तत्काळ फरासखाना पोलीस ठाणे गाठले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना सर्व हकिगत सांगितली.
याबाबत मिलिंद गायकवाड यांनी सांगितले की, नोकराला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर प्रथम त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो विसंगत अशी माहिती देत होता. त्याने त्याचे अपहरण क्लोरोफार्म लावून केल्याचे सांगितले होते. याबाबत डॉक्टरांकडे चौकशी केली असता क्लोरोफार्म लावल्यानंतर साधारण पाच तास व्यक्ती शुद्धीवर येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, देवाशी दोन तासातच शुद्धीवर आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यानेच पैशासाठी हा बनाव रचल्याचे सांगितले. चोरलेले दागिने मित्राच्या घरी ठेवून रिक्षाने संगमवाडी पूल येथे तो गेला आणि त्याने हातावर जखमा करून घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून एका वाहिनीवर सुरू असलेल्या गुन्हेगारीविषयक मालिकेतून दागिने चोरण्याचा बनाव रचल्याचे देवाशीने पोलिसांना तपासात सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे यांच्या पथकाने या गुन्ह्य़ाची उकल केली.