पुणे : विद्यार्थी वाहतूक करणारी बस विजेच्या खांबावर आदळून झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हडपसरमघील काळेपडळ परिसरात गुरुवारी (२ मार्च) अपघात झाला होता. अपघातात विद्यार्थी जखमी झाले होते.

या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी नंदकुमार जावळे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी बस चालक विद्यार्थी वाहतूक करतो. हडपसरमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन बस चालक गुरुवारी (२ मार्च) दुपारी एकच्या सुमारास निघाला होता. त्या वेळी काळेपडळ परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटले.

बस रस्त्यच्या कडेला असलेल्या खांबावर आदळली. बसमध्ये २५ ते ३० विद्यार्थी होते. बस खांबावर आदळल्यानंतर विद्यार्थांना दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरधाव बस चालवून अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बसच्या धडकेत विजेचा खांब पूर्णपणे वाकला. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करत आहेत.

कोथरूडमध्ये घरफोडी; साडेपाच लाखांचा ऐवज चोरी

सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पौड रस्ता भागातील धनश्री सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय सदनिका बंद करुन १ मार्च रोजी बाहेर गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी उजवी भुसारी काॅलनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार दगडे तपास करत आहेत.