वेकफील्ड इमारतीमधील बजाज फायनान्स या कंपनीमध्ये चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्स पुरविण्यासाठी खंडणी मागणाऱ्या दोघा गुंडांना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून पकडले.

शहरात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये माल पुरवठा करणाऱ्यांना गुंडांचा त्रास सातत्याने सहन करावा लागत आहे. इतकेच नाही तर या कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या परवानगीशिवाय माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना आतही सोडले जात नसल्याचे चित्र दिसून आले आहे.

इफराज फिरोज शेख (वय ३०, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) आणि तुषार विष्णू आढवडे (वय ३६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार आसिफ ऊर्फ बबलू युसूफ खान (रा. येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जयपाल गोकुळ गिरासे (वय २४, रा. अतुलनगर, वारजे माळवाडी) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी १५ एप्रिल रोजी दुपारी वेकफिल्ड इमारतीमधील बजाज फायनान्स या कंपनीमध्ये चहा, कॉफीचे मटेरियलचे बॉक्स देण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील प्रवेशद्वारावर आरोपींनी फिर्यादींची गाडी अडविली. ‘तू बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयामध्ये स्वत: चहा, कॉफी मटेरियलचे बॉक्स नेऊन ठेवले तरी मला प्रत्येक फेरीमागे पाचशे रुपये द्यावे लागतील. तू जोपर्यंत पैसे देणार नाही, तोपर्यंत तुझी गाडी आत जाऊ देणार नाही‘, अशी धमकी दिली. फिर्यादीस आसिफ खान याने १८ एप्रिल रोजी फिर्यादी यांना दूरध्वनी करून प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली. फिर्यादी यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारी दुपारी दोन वाजता फिर्यादी दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि दोन पाचशेच्या खऱ्या नोटा घेऊन वेकफिल्ड इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. तेथे इफराज शेख आणि तुषार आढवडे हे पैसे घेण्यासाठी आले. त्यांनी फिर्यादीकडून पैसे घेतल्यानंतर तेथे असलेल्या पोलिसांनी दोघांना पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करत आहेत.