पुणे : गुलटेकडीतील गोळीबार प्रकरणानंतर उमाप टोळीतील सराईताच्या खुनाचा कट गुन्हे शाखेने उधळून लावला. या प्रकरणी शेखापुरे टोळीतील तिघांना अटक करण्यात आली.
अमित मलिक्कार्जुन शेखापुरे, निखिल ज्ञानोबा लगाडे, अन्वर उर्फ जंबा शाकीर शेख (तिघे रा. मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. गुलटेकडीतील औद्योगिक वसाहतीत शेखापुरे आणि उमाप टोळीत वर्चस्वातून वाद सुरू आहेत. येथे १५ दिवसांपूर्वी अल्पवयीनांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत माजविल्याची घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यानंतर उमाप टोळीने शेखापुरे टोळीतील एकावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. या प्रकरणी उमाप टोळीतील सराईतांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर शेखापुरे टोळीतील सराईतांनी उमाप टोळीतील सराईताच्या खुनाचा कट रचला. शेखापुरे आणि साथीदारांनी देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले होते. अमित शेखापुरे सोमवार पेठेत थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले.
शेखापुरेचे साथीदार लगाडे आणि शेख हे या कटात सामील असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अकबर शेख, राहुल ढमढेरे, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, उज्ज्वल मोकाशी, विनायक वाघमारे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून लगाडे आणि शेख यांनाही ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संदीप पवार, युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप आणि पथकाने ही कारवाई केली.
सराईताशी संपर्क पोलिसाला अंगलट
मटका, जुगार अड्डा चालविणाऱ्या सराईताच्या संपर्कात राहणाऱ्या समर्थ पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याची वेतनवाढ एक वर्ष रोखण्याचा आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिला.
सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरातील सराईत प्रवीण राजेंद्र चव्हाण (वय ३५) याच्याविरुद्ध जुगार, बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारवाई केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने वैद्यकीय कारणास्तव रजा घेतल्यानंतर, तो चव्हाण याच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर रावले यांनी संबंधित कर्मचाऱ्याची वेतनवाढ दोन वर्षे रोखण्याचा आदेश दिला. कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे बाजू मांडल्यानंतर त्याला देण्यात आलेल्या शिक्षेत बदल करून वेतनवाढ एक वर्ष रोखण्याचा आदेश देण्यात आला.
यापूर्वी गुन्हे शाखेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चव्हाणच्या संपर्कात आल्याने निलंबित करण्यात आले होते. चव्हाणच्या मोबाइलची तांत्रिक तपासणी करताना ही बाब उघड झाली होती.
