कात्रज-देहूरोड बाह्य़वळण मार्गावर वडगाव बुद्रुक येथे रस्त्याने पायी जात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून त्याच्याकडील ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लुटला. त्यानंतर त्याला दिघी येथे सोडून चोरटे पसार झाले. गुरुवारी रात्री ही घटना घडल्यानंतर या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
चंदन शर्मा (वय २०, रा. सिंहगड महाविद्यालय आवार, आंबेगाव. मूळ रा. राजस्थान) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास चंदन हा रस्त्याने पायी सिंहगड महाविद्यालयाकडे निघाला होता. मोटारीतून आलेल्या दोघांनी त्याला लिफ्ट देण्याचा बहाणा केला. चंदन मोटारीत बसल्यानंतर चोरटय़ांनी मोटार महाविद्यालयाच्या दिशेने न नेता खेडशिवापूरच्या दिशेने नेली. त्यामुळे चंदनने याबाबत विचारणा केली असता चोरटय़ांनी त्याला शिवीगाळ केली व त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. चोरटय़ांनी चंदनला त्याच्या खिशातील सर्व साहित्य काढण्यात सांगितले.
चंदनच्या खिशातून चोरटय़ांनी त्याचे एटीएम कार्ड काढून घेतले व दरडावून त्याला पिन क्रमांक विचारला. या कार्डचा वापर करून चोरटय़ांनी एटीएममधून ५० हजारांची रक्कम काढली. त्यानंतर चोरटे त्याला वाकड येथे घेऊन गेले. तेथे चंदनचे पॅनकार्ड, दोन मोबाइल असा एकूण ७१ हजार रुपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर चंदनच्या डोळ्यावर मिरचीचा स्प्रे मारून त्याला दिघी येथे सोडून चोरटे पसार झाले.