पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणी न करता बसमधून प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी बस मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस मालक हडपसरमदील काळेबोराटेनगर परिसरात राहायला आहे.

प्रवासी वाहतुकीसाठी त्यने बस खरेदी केली होती. बसची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात न करता बसचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करण्यात येत होता. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर दुसऱ्या एका बसच्या वाहन क्रमांकाचा वापर करण्यात आला होता. नोंदणी न करता बेकायदा प्रवासी वाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सलगर तपास करत आहेत.

रिक्षा प्रवासी ज्येष्ठाला मारहाण करुन रोकड लुटली

रिक्षा प्रवासी ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी ६० हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना वानवडी भागात घडली. या प्रकरणी चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे दोन दिवसांपूर्वी रिक्षातून वानवडी परिसरातून रात्री साडेदहाच्या सुमारास निघाले होते. वानवडी बाजार परिसरातील मथुरावाला मैदानाजवळ अंधारात दुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी रिक्षा अडवली. ज्येष्ठाला धक्काबुक्की करुन चोरट्यांनी ६० हजारांची रोकड लुटून नेली.

घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने आरडाओडा केला. दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे तपास करत आहेत.

कल्याणीनगरमध्ये मोटारीच्या डिक्कीतून रोकड चोरी

कल्याणीनगर भागात मोटारीची डिक्की उचकटून ३० हजारांची रोकड, तसेच महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यां विरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका मोटार चालकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तका्ररादार ५५ वर्षीय मोटार चालक हे कल्याणीनगर भगात राहायला आहेत. कल्याणीनगरमधील गल्ली क्रमांक सहामधील एका सोसायटीसमोर त्यांनी मोटार लावली. चोरट्यांनी मोटारीची डिक्की उचकटून ३० हजारांची रोकड आणि कागदपत्रे असा मुद्देमाल चोरून नेला.

पोलीस उपनिरीक्षक फटांगरे तपास करत आहेत. शहर परिसरात मोटारीची डिक्की उचकटून रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी मोटार चालकांचे लक्ष विचलित करुन रोक़ड, ऐवज चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली होती.