scorecardresearch

पुणे: सराईत गुन्हेगाराचा बोपदेव घाटात गोळीबाराचा बनाव, व्यावसायिकाला गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

८० लाखांच्या खंडणीची मागणी

पुणे: सराईत गुन्हेगाराचा बोपदेव घाटात गोळीबाराचा बनाव, व्यावसायिकाला गुन्ह्यात अडकविण्याची धमकी
( प्रतिनिधिक छायाचित्र )

बोपदेव घाटात झालेल्या गोळीबार प्रकरणाचा उलगडा गुन्हे शाखेने केला असून, गोळीबार प्रकरणातील फिर्याद देणाऱ्या गुंडानेच एका व्यावसायिकाला गोळीबाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन व्यावसायिकाकडे ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुंडासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>>विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना

या प्रकरणी असीफ इस्माइल खान (वय ३३, रा. कोणार्क पूरम सोसायटी, कोंढवा) याच्यासह साथीदार फय्याज पठाण, समीर मेहबुब शेख, शहाबाद मेहबुब खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खान सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात ओैरंगाबाद जिल्ह्यात दरोडा तसेच खंडणीचा गुन्हा दाखल आहे. २६ नोव्हेंबर रोजी बोपदेव घाटात मध्यरात्री अज्ञातांनी गोळीबार केला, अशी फिर्याद खान याने कोंढवा पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा >>>ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

खानने व्यावसायिक संतोष थोरात यांनी गोळीबार केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात खान याने थोरात यांना गोळीबाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ८० लाख रुपयांची खंडणी मागिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने थोरात यांच्यावर दबाब आणून सहा लाख रुपयांची खंडणी उकळली होती. त्यानंतर पोलिसांनी खान आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, रमेश साबळे आदींनी ही कारवाई केली.

आरोपी खान याने एका मंत्र्याच्या नातेवाईक असल्याची बतावणी केली. त्याने खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:56 IST

संबंधित बातम्या