पुणे : विधानसभेत चांगले संख्याबळ प्राप्त करण्यासाठी भिस्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने लक्ष केंद्रित केले आहे. बारामतीतील गोविंदबाग या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या गर्दीने हे संकेत दिले आहेत. लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला धक्का देण्याची जोरदार तयारी पवार यांनी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मंगळवारपासून तीन दिवसांच्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी अनेक नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला सहकार आणि साखर पट्टा अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का देऊन पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे अधिक खासदार निवडून आणले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा मिळविण्याची रणनीती पवार यांनी आखली आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर ग्रामीणचे भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे यांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर, इंदापूरचे माजी आमदार, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पवार यांची ‘गोविंदबाग’ येथे भेट घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा – विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि पंढपूर तालुक्यातील इच्छुकांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पवार यांची मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघातील अनेक नेत्यांनीही मतदारसंघासंदर्भात पवार यांची भेट घेतली. अनिल देसाई समर्थकांनीही पवार यांच्यासमवेत चर्चा केली. तर पवार यांचे समर्थक अप्पासाहेब जगदाळे यांनीही इंदापूर येथून निवडणूक लढविण्यासंदर्भात पवार यांची भेट घेत चाचपणी केली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची गोविंदबागेत खलबते रंगल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील सूत्रांकडून करण्यात आला.