लोणावळा : वर्षाविहारासाठी लोणावळा शहर परिसरात मुंबई-पुण्यातील पर्यटकांची होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. लोणावळा परिसरात कोंडी सोडविण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी मुंबई-पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागातील पर्यटक लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी करतात. सलग सुट्या आल्यास पर्यटकांच्या गर्दीत वाढ होते. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पर्यटकांची उच्चांकी गर्दी होती. लोणावळ्यातील भूशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी होते. पर्यटकांची वाहने कोंडीत अडकतात. कोंडीमुळे उडणारा गोंधळ, तसेच लोणावळ्यातील वाहतूक विस्कळीत होत असल्याने पोलिसांनी आतापासून नियोजन सुरू केले आहे, अशी माहिती लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा…पुणेरी मेट्रोला गती! हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर‘थर्ड रेल’ विद्युतीकरण कार्यान्वित होणार

शनिवार, रविवारला जोडून सुटी आल्यास पर्यटकांची गर्दी होती. लोणावळा, खंडाळा, पवनानगर परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त १०० पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक मागविण्यात आली आहे. कोंडी सोडविण्यासाठी गृह रक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. पोलीस मित्रांचे पथक पोलिसांना सहाय करणार आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी पोलीस मित्र, स्वयंसेवकांना सूचना दिल्या आहेत, असे उपविभागीय अधिकारी कार्तिक यांनी नमूद केले.

मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंबरवाडी गणपती मंदिर परिसरातील अंतर्गत रस्त्यावरून पुण्याकडे जाणारी वाहने इंदिरानगर, तुंगार्ली, नारायणधाम पोलीस चौकी समोरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात येणार आहे. भुशी धरणाकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कैलासनगर स्मशानभूमी, हनुमान टेकडी, कुसगाव गणपती मंदिर मार्गे सिंहगड महाविद्यालय परिसरातून द्रुतगती मार्गावर जावे. मुंबईकडे जाणारी वाहनचालकांनी रायवुड पोलीस चौकी, खंडाळा गेट क्रमांक ३०, अपोलो गॅरेज येथील रेल्वे फाटक परिसरातून जावे.

हेही वाचा…महायुती : रामदास आठवलेंचा विधानसभेच्या आठ ते दहा जागांवर दावा; म्हणाले…

वाहतूक नियोजनासाठी नियंत्रण कक्ष

वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कुमार पोलीस चौकीत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षातून लोणावळा शहरातील कोंडीवर लक्ष ठेवण्यात येणार असून, कुमार पोलीस चौकी, ए वन चिक्की चौक, मिनू गॅरेज चौक, मावळी पुतळा चौक, सहारा पूल परिसरात ध्वनीवर्धक लावण्यात येणार आहे. ध्वनिवर्धकावरुन वाहनचालकांना माहिती देण्यात येणार आहे. लोणावळा बाजार परिसरात होणारी कोंडी सोडवण्यासाठी भांगरवाडी इंद्रायणी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान एकेरी मार्ग सुरू करण्यात आला आहे. लोणावळ्यात येणारी वाहने पुरंदरे शाळेसमोरील रस्ता, तसेच भांगरवाडीकडे जाणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य रस्त्याने जाणार आहेत. शहरात सम-विषम दिनांकानुसार वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

हेही वाचा…कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल पोलिसांकडून बाल न्याय मंडळाकडे सादर; काय आहे अहवालात?

हुल्लडबाजांवर कारवाई

भुशी धरणाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यात वाहने थांबविण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे वाहने लावावीत. खंडाळा राजमाची पॉईंट परिसरात वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतने वाहने लावू नयेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पर्यटकांनी पालन करावे. हुल्लडबाजांवर कारवाई करण्यासाठी लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तैनात करण्यात येणार आहे, असा इशारा कार्तिक यांनी दिला.