पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) आता १२ आणि १३ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. उमेदवारांना देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांबाबतची माहिती परीक्षेपूर्वी १५ दिवस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सीबीएसईने या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. सीबीएसईतर्फे २२व्या सीटीईटीसाठी ११ मे ते १० जून या कालावधीत अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली होती. तर परीक्षा ६ सप्टेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना पुरेशी संधी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या व्यापक हिताचा विचार करून प्रस्तावित सीटीईटीसाठी नोंदणी करू न शकलेल्या उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी २५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर देशभरातील परीक्षा केंद्रांवर १२ आणि १३ डिसेंबर रोजी सीटीईटी आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांचे परीक्षा केंद्र आणि परीक्षेची तारीख परीक्षेपूर्वी १५ दिवस, तर प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी दोन दिवस आधी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे. तसेच शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी २०२८पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे सीटीईटी किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन आवश्यक पात्रता मिळवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत. देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या सीटीईटीशिवाय राज्यांमध्ये स्वतंत्रपणे टीईटी परीक्षाही घेतली जाते. सीटीईटी परीक्षेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांना शिकवू इच्छिणाऱ्या शिक्षकांना पेपर एक द्यावा लागतो, तर इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतच्या वर्गांना शिकवू इच्छिणाऱ्या शिक्षकांना पेपर दोन द्यावा लागतो. सीटीईटी परीक्षा ओएमआर पद्धतीने घेतली जाते. प्रत्येक पेपर १५० गुणांचा असतो. प्रश्नपत्रिकेत १५० बहुपर्यायी प्रश्न असतात. सर्वसाधारण गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ६० टक्के, तर राखीव गटातील उमेदवारांना ५५ टक्के गुण आवश्यक असतात. सीटीईटीमध्ये उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आजीवन वैध असते.