scorecardresearch

जिरे महागले ; गुजरात, राजस्थानातील लागवडीत घट

स्वयंपाकघरात सढळ हाताने वापरले जाणारे जिरे महागणार आहेत. राजस्थान, गुजरातमधील शेतकऱ्यांनी जिऱ्याची लागवड कमी केल्याने उत्पादनातही मोठी घट झाली आहे.

राहुल खळदकर, लोकसत्ता

पुणे : स्वयंपाकघरात सढळ हाताने वापरले जाणारे जिरे महागणार आहेत. राजस्थान, गुजरातमधील शेतकऱ्यांनी जिऱ्याची लागवड कमी केल्याने उत्पादनातही मोठी घट झाली आहे. परिणामी जिऱ्याचे दर यापुढील काळात तेजीत राहणार असल्याचे निरीक्षण गुजरातमधील जिरे व्यापाऱ्यांनी नोंदविले.

 गेली तीन वर्षे जिऱ्याचे दर स्थिर होते. साधारणपणे १३० ते १७० रुपये किलो या दराने जिऱ्याची विक्री केली जात होती. देशात जिऱ्याची लागवड राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करतात. गुजरातमधील सौराष्ट्र विभागातील कच्छ, भावनगर, राजकोट या भागातील शेतकरी जिरे लागवड करतात. राजस्थानात पाकिस्तान सीमेलगतचे शेतकरी जिरे लागवड करतात. गेले तीन वर्ष राजस्थान आणि गुजरातमघ्ये जिरे लागवडीत वाढ झाली होती. मात्र, अपेक्षेएवढे दर न मिळाल्याने तेथील शेतकऱ्यांनी डाळ, बटाटा लागवडीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे यंदाच्या हंगामात जिरे लागवडीत मोठी घट झाली, असे गुजरातमधील उंजा येथील जिरे व्यापारी रमेश पटेल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मार्च महिन्यात जिऱ्याचा हंगाम सुरू झाला असून सध्या एक किलो जिऱ्याला २१० रुपये असे दर मिळाले आहेत. दिवाळीत जिऱ्याला प्रतिकिलोमागे १६० रुपये दर मिळाला होता. गेले तीन वर्ष जिऱ्याचे दर स्थिर होते. मात्र, उत्पादन घटल्याने यापुढील काळात जिऱ्याचे दर तेजीत राहणार असून २७५ ते ३०० रुपये किलोपर्यंत  पोहोचण्याची शक्यता पटेल यांनी व्यक्त केली.

साठाही कमी..

गेल्या वर्षी मार्च महिन्यात राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यातून मिळून  जिऱ्याच्या ९५ लाख पिशव्या एवढे उत्पादन मिळाले होते. त्या वेळी ३० लाख पिशव्या शिलकीत होत्या. एकूण मिळून एक लाख २५ हजार पिशव्यांचा साठा बाजारपेठेत होता. यंदाच्या हंगामात ४० लाख पिशव्या एवढेच उत्पादन मिळणार आहे. २५ लाख पिशव्यांचा साठा बाजारात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिऱ्याचा साठा कमी आहे. एका पिशवीत साधारणपणे ५० ते ५५ किलो जिरे असतात.

गुजरातमधील अहमदाबादपासून शंभर किलोमीटर अंतरावर उंजा येथे  जिऱ्याची मुख्य बाजारपेठ आहे. तेथील बाजारातून देशभरात जिरे विक्रीस पाठविले जातात. भारतातून चीन, कुवेत, युरोप, बांगलादेश, इराण या देशात जिरे  निर्यात केले जातात. तुर्की तसेच सिरीया येथे जिऱ्याची लागवड केली जाते. मात्र, तेथील जिऱ्याच्या तुलनेत भारतीय जिऱ्याची प्रतवारी उत्तम मानली जाते. तुर्की, सिरियामध्ये एकूण मिळून पाच हजार टन जिऱ्याचे उत्पादन होते. जगभरातून असलेली मागणी विचारात घेता, तुर्की, सिरियातील जिऱ्याचे उत्पादन कमी आहे तसेच तेथील जिरे भारतीय जिऱ्याच्या तुलनेत महागही आहेत.

– रमेश पटेल, जिरे व्यापारी, वीरल अॅग्रोटेक, उंजा, गुजरात

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cumin expensive decline cultivation gujarat rajasthan production amy

ताज्या बातम्या