पुणे : सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भारत मुक्ती मोर्चातर्फे आयोजित सत्यशोधक संमेलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, माजी आमदार व ‘उपरा’कार लक्ष्मण माने, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, अॅड. वासंती नलावडे, बामसेफचे उपाध्यक्ष व्ही. व्ही. जाधव, प्रतिभा उबाळे, सचिन बनसोडे, संगिता शिंदे यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर जाणवते. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुरोगामी विचार पुढे नेले. त्यामुळे पुरोगामी विचारांना अखंड साथ राहील.
हेही वाचा >>> राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,’ बारामतीमधून सुप्रिया सुळे…’
कॉंग्रेस तसेच भारतीय जनता पक्षाच्या आघाड्यांच्या रूपात ब्राह्मणशाहीने पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. हाच सर्वसमावेशक लोकशाहीतील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे भविष्यात देशात सर्वसमावेशक लोकशाही आणणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी सत्यशोधक चळवळीत प्रासंगिकतेनुसार बदल करून नव्या रूपात आणणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी व्यक्त केले.
देशात सर्वसमावेशक लोकशाही प्रस्थापित होईपर्यंत समता मूल्य प्रस्थापित होणार नाहीत. त्यासाठी सत्यशोधक आंदोलन पुन्हा नव्या जोमाने उभारावे लागेल. देशातील सहा लाख गावांमध्ये सत्यशोधक आंदोलन पोहोचविण्याचा संकल्प आहे, असे मेश्राम यांनी सांगितले.
हेही वाचा >>> बारामतीमधून कोण निवडणूक लढविणार? सुनील तटकरे म्हणाले, ‘हा निर्णय…’
डॉ. आढाव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला ‘इंडिया’ साकारायचा आहे. त्यासाठी समाजात समतेवर आधारित मूल्ये रूजवणे आवश्यक आहे. नव्या संसद भवनातील पहिल्या दिवशी सर्व खासदारांना घटनेची प्रत दिली गेली. त्यात समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता शब्द नाहीत. ही लबाडी आहे. यातून सरकारची दिशा ओळखली पाहिजे.
ब्राह्मण वैदिक असून बहुजन-आदिवासीच खरे हिंदू आहेत. वैदिक धर्माचे उच्चाटन झाल्याशिवाय बहुजनांचे उत्थान होणार नाही. त्यासाठी माझ्या संघटनेचा उदयनिधी स्टॅलिनला जाहीर पाठिंबा आहे, असे माने यांनी जाहीर केले. सत्यशोधक विचार हा मानवता प्रस्थापित करण्यासाठी आहे, कोणत्याही जातीधर्मविरोधात नाही, असे गायकवाड यांनी सांगितले.