पुणे : फोडणीसाठी सढळ हाताने कढीपत्त्याचा वापर करणाऱ्या गृहिणींना आता हात आखडता घ्यावा लागणार आहे. बाजारात सध्या कढीपत्त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातून कढीपत्ता मागविण्यात आला आहे. एरवी घाऊक बाजारात ५० ते ७० रुपये किलो अशा भावाने कढीपत्त्याची विक्री केली जाते. बाजारात कढीपत्ता उपलब्ध नसल्याने आंध्र प्रदेशातून मागविण्यात आलेल्या एक किलो कढीपत्त्याला नवी मुंबईतील बाजार समितीच्या आवारात ३५० ते ४०० रुपये किलो असा भाव मिळाला आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक किलो कढीपत्त्याची १५० ते २०० रुपये किलो अशा भावाने विक्री केली जात आहे.

गेल्या महिनाभरापासून बाजारात कढीपत्त्याचा तुटवडा जाणवत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, यवत, केडगाव, तसेच अहिल्यानगर भागातील मांडवगण फराटा भागात कढीपत्त्याची लागवड केली जाते. या भागातून कढीपत्ता पुण्यातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जातो. मुंबईतील बाजारपेठेत नाशिक, खेड, मंचर परिसरातून कढीपत्ता विक्रीस पाठविला जातो. मागणीच्या तुलनेत कढीपत्याची आवक अतिशय कमी प्रमाणावर होत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील बाजारपेठेतून शेतकऱ्यांकडून कढीपत्ता खरेदी करण्यात येत आहे. कढीपत्त्याला चांगला दर मिळत असल्याने तेथील शेतकऱ्यांनी पुण्या-मुंबईतील बाजारात कढीपत्ता विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे.

‘कढीपत्त्याला वर्षभर मागणी असते. केटरिंग व्यावसायिक, उपाहारगृहचालक, तसेच किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांकडून कढीपत्त्याला मागणी असते. किरकोळ बाजारात कढीपत्त्याच्या जुडीची विक्री केली जाते. महिनाभरापूर्वी कढीपत्त्याची जुडी किरकोळ बाजारात दहा रुपयांना होती. कढीपत्त्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर सध्या मुंबई, पुणे, ठाण्यातील बाजारपेठेत कढीपत्त्याच्या एका जुडीची विक्री २० ते ३० रुपये दराने केली जात आहे,’ असे किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

सध्या बाजारात कढीपत्त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. आंध्र प्रदेशातून कढीपत्त्याची आवक होत असून, मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडत आहे. – सिद्धार्थ चव्हाण, कढीपत्ता व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

‘नियमित ग्राहकांनाही फुकटात नाही’

भाजीपाला नियमित खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून कढीपत्त्याचे पैसे घेतले जात नव्हते. मात्र, गेल्या एक ते दीड महिन्यापासून कढीपत्त्याचे भाव तेजीत आहेत. परराज्यांतील कढीपत्याचे भाव तेजीत आहे. कढीपत्ता वाळू नये म्हणून पाणी मारले जाते. घाऊक बाजारातून एक किलो कढीपत्ता खरेदी केला जातो. कढीपत्ता वाळल्यानंतर प्रत्यक्षात त्याचे वजन ८५० ते ९०० ग्रॅम भरते. कढीपत्त्याला पहिल्यांदाच उच्चांकी भाव मिळाला आहे, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.