बँकेच्या नावाने ईमेल पाठवून डेक्कन भागातील एका नोकरदार व्यक्तीच्या खात्यावरून इंटरनेट बँकिंगद्वारे साडेतीन लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद विश्वनाथ सहस्रबुद्धे (वय ५९, रा. यमुना निवास, एरंडवणा पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथील एका डेअरीमध्ये सहस्रबुद्धे नोकरीला आहेत. त्यांचे भांडारकर रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. १७ डिसेंबर रोजी सहस्रबुद्धे यांना बँकेच्या नावाने एक ईमेल आला. त्यामध्ये ‘तुमचे खाते हे नवीन योजनेनुसार असल्यामुळे लॉक करून ठेवले आहे. इंटरनेट बँकींगची सुरक्षा वाढविण्यासाठी खात्याची माहिती ७२ तासांच्या आत द्यावी. अन्यथा तुमचे खाते बंद केले जाईल,’ असे लिहिण्यात आले होते. त्या मेलमध्ये दोन अर्ज होते. त्या अर्जावर  सहस्रबुद्धे यांनी बँक खात्याची सर्व माहिती पासवर्ड भरून पाठविली. त्यानंतर २१ डिसेंबरला गणेश नावाच्या व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. इंटरनेट बँकींगच्या सुरक्षिततेसाठी एक ‘वन टाईम पासवर्ड’  तुम्ही बँकेतून फोन आल्यानंतर सांगा, असे सांगितले.
 सहस्रबुद्धे यांनी त्या व्यक्तीला बँका अशा प्रकारची माहिती मागत नसल्याचे सांगितले. मात्र, ही माहिती एकदाच सांगायची असल्याचे गणेश नावाची व्यक्ती म्हणाली. त्यानंतर चार वेळा फोन करून त्या व्यक्तीने  सहस्रबुद्धे यांच्याकडून ‘वनटाईम पासवर्ड’ विचारून घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यावरून दोन वेळा पैसे हस्तांतर झाले. यामध्ये त्यांच्या खात्यावरून तीन लाख ३६ हजार रुपये दुसऱ्या खात्यावर हस्तांतर करून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर जोशी अधिक तपास करत आहेत.