पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांकडून नऱ्हे पोलिसांकडून एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण नऱ्हे परिसरात राहायला आहे. त्याने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. विवाहविषयक संकेतस्थळावरुन त्याची तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर तरुणीने त्याला जाळ्यात ओढले.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष तरुणीने त्याला दाखविले. त्यानंतर तरुणीच्या बँक खात्यात तक्रारदार तरुणाने साडेपाच लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर तरुणाला परतावा मिळाला नाही. त्याने तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळखीतून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विवाहविषयक संकेतस्थळावर नाेंदणी करताना खातरजमा करणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ३७ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक मुंढवा परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.
चोरट्यांच्या खात्यात त्यांनी गेल्या दोन महिन्यात वेळोवेळी ३७ लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले होते. व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.
बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करुन ज्येष्ठाची फसवणूक
बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.
तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे माॅडेल काॅलनी परिसरात राहायला आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी ११ एप्रिल रोजी संपर्क साधला. एका खासगी बँकेतून बोलत असल्याची बतावणी चारेट्यांनी केली. बँकेकडून बँक खाते अद्ययावत करण्यात येणार असून, चोरट्यांनी त्यांना बँक खात्याची माहिती पाठविण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक एपीके फाईल पाठविली.
ज्येष्ठाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला असल्याने चोरट्यांनी मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. बँक खात्यातून साडेसहा लाख रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळविण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत.
