पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षात खुनाच्या ६३ घटना घडल्या. त्यातील २१ खून प्रेमसंबंधातून, तसेच जुन्या भांडणातून सात खून झाले आहेत. एकीकडे खुनाच्या गुन्ह्यासह इतर गुन्ह्यात घट झाली असताना दुसरीकडे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

२०२४ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचे १६८ गुन्हे दाखल होते. २०२५ मध्ये १९४ गुन्हे घडले आहेत. बलात्काराच्या ३०१ घटना घडल्या असून विनयभंगाचे ३९२ गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षभरात सहा हजार ९०४ विविध गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत केला.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वार्षिक कामगिरीची माहिती पोलीस आयुक्त चौबे यांनी बुधवारी दिली. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली यावेळी उपस्थित होते.

चौबे म्हणाले, ‘२०२५ मध्ये खुनाच्या घटनेत २२.८५ टक्क्यांनी घट झाली. ६३ खून झाले आहेत, तर २०२४ मध्ये हाच आकडा ८५ होता. खुनाच्या प्रयत्नाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, १९४ घटना घडल्या आहेत. विनयभंगाच्या ३९२ घटना घडल्या असून, त्यातील परिचित व्यक्तीकडून विनयंभग झाल्याच्या ३७६ घटना आहेत. बलात्काराच्या ३०१ घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये २९९ परिचित व्यक्तींकडून आणि त्यापैकी लग्नाच्या आमिषाने १२० घटना घडल्या आहेत. दरोड्याच्या गुन्ह्यात घट झाली असून, २० गुन्हे दाखल आहेत. जबरी चोरीच्या १८२, सोनसाखळी चोरीच्या ७५ घटना घडल्या आहेत. घरफोडीच्या २८५ घटनांची नोंद झाली आहे. वाहनचोरीचे ९०६ गुन्हे घडले आहेत. २४३ पिस्तूल आणि ९०८ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा आयुक्त चौबे यांनी केला.

सायबर फसवणुकीच्या ११२ गुन्ह्यांची उकल

आयुक्तालयाच्या हद्दीत सायबर फसवणुकीचे २६९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ११२ गुन्हे उघडकीस आले असून, २१५ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ कोटी ३८ लाख ५९ हजार ८४२ रुपये वसूल करून संबंधित नागरिकांना परत केले आहेत.

संवेदनशील १०४५ ठिकाणी पोलिसांची गस्त

गेल्यावर्षी ४५ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील २१३ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. ३५ गुन्हेगार स्थानबद्ध, तर ३६८ गुन्हेगार तडीपार केले आहेत. एका वर्षात पाच हजार ८१८ अवैध धंद्यांबाबत गुन्हे नोंदवून १६ कोटी ३७ लाख ११ हजार ४८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे कमी होण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवायांसह पोलीस गस्त वाढविली. एक हजार ४५ संवेदनशील ठिकाणे निश्चित करून तिथे सातत्याने पोलीस गस्त वाढविली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ३३ कोटींचा दंड वसूल

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चार हजार ५८० वाहन चालकांकडून, फॅन्सी नंबर प्लेट ५६ हजार २४३, एका दुचाकीवरून तिघांनी (ट्रीपलसीट) प्रवेश केल्याप्रकरणी ७४ हजार ५१२, जड-अवजड एक लाख २ हजार ७२९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहनांना काळी काच लावणाऱ्या ४० हजार ४२० आणि दुचाकींना सायलेन्सर बसविणाऱ्या १३ हजार ७९० जणांवर कारवाई केली. या सर्वांकडून ३२ कोटी ८४ लाख ९० हजार ७२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.