पिंपरी : शेअर मार्केटमधील गुंतवणूक, शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने पाच प्रकरणात ४ कोटी ५० लाख चार हजार ९४८ रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत सायबरसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शेअर मार्केटच्‍या नावाखाली १.२३ कोटींची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ३०० ते ५०० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल एक कोटी २३ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. ही घटना म्‍हाळुंगे येथे घडली. याबाबत बावधन येथील एका पुरुषाने बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्‍याशी संपर्क साधून विश्‍वास संपादन केला. त्‍यानंतर शेअर मार्केटमध्ये ३०० ते ५०० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मोबाइल अॅपच्या माध्यमातून एक कोटी २३ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून पाडले. फिर्यादी यांनी पैसे परत मागितल्यावर आणखी रक्कम भरण्याची मागणी केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.

बनावट ‘सीएमसी’ कंपनीच्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक

वाकड परिसरातील एका व्यक्तीला बनावट कंपनीच्या नावाखाली शेअर मार्केटमधील ईटीएफ गुंतवणुकीचे आमिष दाखवत दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे. याबाबत वाकड येथील एका पुरुषाने सायबर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट कंपनीचे संकेतस्थळ वापरून शेअर मार्केटमध्ये ईटीएफ गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीकडून तब्बल एक कोटी ५१ लाख आठ हजार ५३० रुपये गुंतवून घेतले. त्यानंतर खात्यात १ कोटी रुपयांचा आभासी नफा दाखवून तो काढण्यासाठी आणखी ५३ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात गुंतवलेली रक्कम आणि कथित नफा परत न देता आरोपींनी संपर्क तोडला. सायबर पोलीस तपास करत आहेत.

‘शेअर ट्रेडिंग’च्‍या नावाखाली ६४ लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकाची ६४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना संभाजीनगर, चिंचवड एमआयडीसी परिसरात घडली. याबाबत संभाजीनगर, चिंचवड येथील पुरुषाने सायबर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व्हॉटसअपवर संपर्क साधला. एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर एका लिंकच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला खोटा नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. नफा काढण्यासाठी विविध कर व शुल्क भरण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडण्यात आले. एकूण ६४ लाख ४० हजार २१७.१२ रुपये फिर्यादीकडून उकळल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे तपास करत आहेत.

‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे सांगून ३५ लाखांची फसवणूक

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून पिंपरीतील व्यक्तीकडून ३५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी तीन अज्ञात मोबाइल धारकांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पिंपरी येथील एका पुरुषाने याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातील संपर्क केलेल्‍या आरोपीने आपण सीबीआय अधिकारी असल्‍याचे सांगितले. आरोपींनी मनी लॉन्डरिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून खात्याची पडताळणी करण्याच्या नावाखाली ३५ लाख रुपयांची रक्‍कम ट्रान्सफर करून घेतली. तपासणी नंतरही ती रक्‍कम परत न देता फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक

बिटकॉइन व इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची ३१ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान आकुर्डी येथे घडला आहे. याबाबत आकुर्डी येथील पुरुषाने निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एका वेबसाईटवर लॉगिन केले. आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर कोणत्या क्रिप्टोकरन्सीत किती रक्कम गुंतवायची व कोणत्या बँक खात्यात पैसे जमा करायचे याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या. त्या सूचनांनुसार फिर्यादीकडून विविध बँक खात्यांमध्ये एकूण ३१ लाख ३५ हजार ४० रुपये जमा करून घेण्यात आले.

गुंतवणुकीवर १.४६ बिटकॉईन अथवा सुमारे ८८ लाख रुपयांची आभासी रक्कम खात्यात दिसत होती. मात्र प्रत्यक्ष रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यावर व्यवहार अडवण्यात आला. त्यानंतर ‘क्रेडिट स्कोअर कमी झाला’ आणि खाते अनफ्रीज करण्यासाठी आणखी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक बनसोडे तपास करत आहेत.

पिंपरीत हेरॉईनसह आरोपी अटकेत

मुंबई-पुणे महामार्गालगत साई चौक परिसरात १६ हजार रुपयांच्या किमतीचे ३.२२ ग्रॅम हेरॉईन बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास ही कारवाई करण्‍यात आली.

वशेष बन्या तामचीकर (वय ३५, रा. भाटनगर, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार दिनेश तुकाराम पुंडे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीदरम्यान आरोपीकडे संशयास्पद हालचाली आढळल्याने तपासणी केली असता १६ हजार रुपयांच्या किमतीचे ३.२२ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. पिंपरी तपास करत आहेत.