पुणे : काळ्या पैशांच्या व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची सहा कोटी २९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री याला सायबर पोलिसांनी अटक केली. वाजंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा माजी पदाधिकारी आहे.
वाजंत्री याच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांत ‘नॅशनल सायबर पोर्टल’विरुद्ध पाच तक्रारी दाखल आहेत. या पाच गुन्ह्यांत वाजंत्री सामील असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी ९ नोव्हेंबर रोजी संपर्क साधला होता. त्याने पोलीस असल्याची बतावणी केली. काळ्या पैशांच्या व्यवहारात (मनी लाँड्रिंग) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवली. या प्रकरणात डिजिटल अटक करण्यात येणार असून, ज्येष्ठाला तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ९ ते १९ नाेव्हेंबरदरम्यान ज्येष्ठाने वाजंत्री याच्या बँक खात्यात सहा कोटी २९ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
सायबर पोलिसांनी वाजंत्रीच्या बँक खात्याचा तपास केला असता, त्याच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले. वाजंत्रीने ९० लाख आणि २० लाख रुपये एका बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवले होते. संबंधित बँक खाते कोकबन येथील ‘धावीर कन्स्ट्रक्शन’चे असल्याचे उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक वाजंत्री आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे गेले. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच तो पसार झाला. तो पनवेलमध्ये असल्याची माहिती खबऱ्याने दिली. सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, केरळ पोलीसही तुषार वाजंत्रीच्या मागावर होते. सायबर पोलिसांनी केरळ पोलिसांशी संपर्क साधला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस कर्मचारी राजुदास चव्हाण, मुंढे, कोंडे, बाळासाहेब चव्हाण, जान्हवी भडेकर, संदीप पवार, संदीप यादव, सचिन शिंदे, सतीश मांढरे यांनी ही कामगिरी केली.