पुणे : संकेतस्थळावर घरातील जुने कपाट विक्रीची जाहिरात देणाऱ्या महिलेला सायबर चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कपाट खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या चोरट्याने महिलेला चुकून आठ लाख रुपये पाठविल्याचा बनावट स्क्रीन शाॅट पाठवून तिची फसवणूक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी आदील फारुखभाई शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला हडपसर भागातील अमानोरा टाऊनशिप परिसरात राहायला आहे. महिलेने घरातील जुने कपाट विक्रीची जाहिरात गृहोपयोगी वस्तू खरेदी विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर टाकली होती. आरोपी आदिलने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याने कपाट खरेदी करायचे असल्याचे सांगून महिलेकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर महिलेच्या मोबाइल क्रमांकावर आरोपीने पुन्हा संपर्क साधला.

हेही वाचा >>> धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कोथरुड पोलिसांकडून एकाला अटक

माझ्याकडून तुमच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने चुकून आठ लाख रुपये पाठविण्यात आले आहेत, अशी बतावणी केली. त्यानंतर त्याने महिलेला आठ लाख रुपये हस्तांतरित झाल्याचे बनावट स्क्रीन शाॅट त्याने पाठविले. महिलेने शहानिशा न करता कपाट विक्रीतील रक्कम वजा करुन आरोपी आदिलच्या बँक खात्यावर सात लाख ६५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविले. त्यानंतर महिलेने आदिलने पाठविलेल्या पैशांबाबत बँकेकडे विचारणा केली. तेव्हा महिलेच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे समजले. महिलेने आरोपीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber thief scammed woman sending fake screenshot fraud sum of seven and a half lakhs rupees pune print news rbk 25 ysh
First published on: 17-01-2023 at 13:06 IST