पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने कोरेगाव पार्क भागात भाडे तत्त्वावरील सायकल योजनेला मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. सायकल योजनेत या भागासाठी दोनशेहून अधिक सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहराच्या विविध भागांत भाडे तत्त्वावरील सायकल योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत कोरेगाव पार्क परिसरात मंगळवारी या सेवेला सुरुवात करण्यात आली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका मंगला मंत्री, लता धायरकर, सहाय्यक आयुक्त अरूण खिलारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी आणि नागरिकांनी सायकल रॅलीतून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला.

कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे, असे डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले. तर सायकलींमुळे शहर प्रदूषणमुक्त होईल, असे डॉ. धेंडे यांनी सांगितले. सध्या कोरेगाव पार्क परिसरातील निवडक ठिकाणीच ही सुविधा देण्यात आली आहे.

सायकल स्थानकावरून सायकल घेतल्यानंतर आणि तिचा वापर झाल्यानंतर दुसऱ्या स्थानकावरही ती ठेवता येणार आहे.