पुणे : ‘पुणे सायकलिंग ग्रँड टूर’ स्पर्धेनिमित्त सायकली चालविण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन मिळाले खरे; पण पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्येही सायकल मार्गांची दुरवस्था आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे सायकली चालविण्याची इच्छा असली, तरी सायकल मार्गांवरील अडथळ्यांचा सामना करीत किंवा मुख्य रस्त्यांवरूनच इतर वाहनांबरोबर सायकल चालविण्याची वेळ प्रमुख शहरांत आली आहे.
वाहतूक आणि विकास धोरण संस्थेने (इन्स्टिट्यूट ऑफ ट्रार्न्स्पोर्टेशन अँड डेव्हलेपमेंट पाॅलिसी – आयटीडीपी इंडिया) ‘सायकलिंग इन अवर सिटीज’ या नावाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या शहरांत अस्तित्वात असलेल्या १५२ किलोमीटर सायकल मार्गांचे मूल्यमापन केले. यासाठी ६०५ सायकलस्वार आणि सायकल चालवीत नसलेल्या (पादचारी) नागरिकांचा समावेश करण्यात आला होता, असे ‘आयटीडीपी’कडून नमूद करण्यात आले.
अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘राज्यातील शहरांमध्ये सायकल मार्गांसाठी चार प्रमुख पायाभूत सुविधांना अनुसरून मार्ग तयार करण्यात आले आहे. यामध्ये पदपथांजवळील सायकल मार्ग, स्वतंत्र सायकल मार्ग, चारचाकी मार्गाजवळील रंगवलेले मार्ग आणि वाहतूक दिव्यांच्या रस्त्यांवरील मार्ग (ट्रॅफिक कॅल्मिंग शेअर्ड स्ट्रीट) आहेत. यात सर्वाधिक अडथळ्यांपैकी ७२ टक्के सायकलस्वारांनी सायकल मार्गांवर इतर वाहने लावलेली असतात, अशी व्यथा मांडली. ६६ टक्के सायकल मार्गावर पथारीविक्रेते, गाड्यांचे अतिक्रमण, आणि ५५ टक्के मार्गांवर दुचाकी आणि वाहनांची वर्दळ असल्याने अडथळे येत असल्याचे म्हणणे सायकलस्वारांनी आणि सायकल न चालविणाऱ्यांनी सर्वेक्षणामध्ये नमूद केले.
महिला सायकलस्वरांच्या नजरेतून
तिन्ही शहरांतील ६०५ सायकलस्वारांपैकी १६० महिला सायकलस्वार होत्या. त्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक महिलांनी खराब रस्त्यांची स्थिती, खड्डे हे प्रमुख अडथळे असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे गंभीर अपघात किंवा समस्या निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. नागपूरच्या तुलनेत पुण्यात सायकलचे मार्ग विस्तारित आहेत. परंतु, पायाभूत सुविधांची आणि दुरुस्तीची अंमलबजावणी वेळेवर होत नसल्याने अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याचे म्हटले आहे. सुमारे ८७ टक्के सायकलस्वार महिलांनी सायकलींसाठी स्वतंत्र मार्गांना प्राधान्य दिले आहे.
सायकलस्वारांचे प्राधान्य
आरामदायी आणि सुलभ सायकल चालविण्यासाठी ५२ टक्के सायकस्वारांनी रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार काँक्रीट किंवा ‘पेव्हर ब्लाॅक’ पेक्षा डांबरी ‘ब्लॅकटाॅप’ला प्राधान्य दिले आहे. सुरळीत आणि विनाडथळा सायकल वाहतुकीसाठी ‘रंबल स्ट्रीप’ ऐवजी ‘स्पीड टेबल’चांगले असून अपघातही कमी होतात, असे सर्वेक्षणातून स्पष्ट केले आहे.
पुणे ग्रँड सायकलिंग टूर पुढील काळातही यशस्वी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सर्वांसाठी कायमस्वरुपी उपयुक्त ठरतील, असे मार्ग तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर शहरांपैकी पुण्यात सायकल मार्ग सर्वाधिक असले, तरी ते दुरवस्थेत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील अरुंद रस्त्यांमुळे त्यालगत असलेल्या सायकल मार्गांवर अपघाताची भीती आहे आणि नागपूरमध्ये सायकल मार्ग कमी आहेत, त्यादृष्टीने पायाभूत सुविधांची बांधणी करावी. – सिद्धार्थ गोडबोले, उपव्यवस्थापक, आयटीडीपी इंडिया
परिसर या संस्थेने सायकल मार्गांच्या केलेल्या लेखापरीक्षणानुसार पुण्यातील केवळ ११ टक्के ट्रॅक चांगले असल्याचे समोर आले होते. उर्वरित ठिकाणी असुरक्षितता, अखंडित मार्गांमध्ये सातत्य नसणे, खड्डेमय मार्ग आणि देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याचे यापूर्वीही नमूद केले होते. या अहवालातून प्रशासनाने आता तरी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पावले उचलावीत. – रणजित गाडगीळ, संचालक, परिसर
पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर शहरात अस्तित्वात असलेल्या सायकल मार्गांच्या पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करण्यावर थांबणे महत्त्वाचे नसून त्यांची वेळोवेळी देेखभाल दुरुस्ती आणि बेशिस्तांवर कठोर कारवाईची अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची आहे. असे झाल्यास तिन्ही शहरात सुधारणा करण्यास मदत होईल. – प्रांजल कुलकर्णी, प्रकल्प व्यवस्थापक, आयटीडीपी
तीन शहरांतील सायकल मार्ग
- पुणे : ९१ किलोमीटर
- पिंपरी-चिंचवड : ५० किलोमीटर
- नागपूर : ११ किलोमीटर
प्रमुख अडथळे आणि प्रतिबंधक घटक
- अडथळे जास्त – ५६ टक्के
- कठोर अंमलबजावणीचा अभाव – ५४ टक्के
- वेगवान वाहने – ४९ टक्के
- सातत्यपूर्ण गतिमानतेचा अभाव – ४१ टक्के

