राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मावळ परिसरात जाऊन ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. मावळ परिसरात अनेक पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले असून याची देखील पाहणी पवार यांनी केली. दरम्यान, तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मावळ परिसरासह पुणे जिल्ह्याला फटका बसला आहे. वादळ आणि मुसळधार पावसामुळे अनेक घराचं आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मावळ परिसरात मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी या भागात अनेक पॉलिहाऊस उभारले आहेत. या पॉलिहाऊसचे चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. भोयरे आणि पवळेवाडी या भागात चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. याची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.

“उद्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना मदत केली जाईल. आम्ही केंद्र सरकारकडे देखील यासाठी मदत मागितली असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.