तीव्र चुरस, नाटय़मय घडामोडीनंतर पिंपरी बाजारपेठेचे राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने डब्बू आसवानी यांना स्थायी समितीचे ‘लाखमोलाचे’ अध्यक्षपद दिले. आसवानी यांना संधी दिल्याने आनंदी तसेच दु:खीही झालेल्या अनेकांच्या उपस्थितीत शनिवारी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तेव्हा अभिनंदन सत्रात सूचक शब्दात बऱ्याच भावना व्यक्त करतानाच पिंपरीतील १० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्टही त्यांना स्वपक्षीयांकडून देण्यात आले.
निवडणूक अधिकारी साखर आयुक्त बिपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. आसवानी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे शर्मा यांनी जाहीर केले. त्यानंतर, झालेल्या कार्यक्रमात सर्वपक्षीय सदस्यांनी आसवानींना शुभेच्छा दिल्या. महापौर शकुंतला धराडे म्हणाल्या, अजितदादांनी सिंधी समाजाला न्याय दिला आहे. योगेश बहल म्हणाले, निवडून येईपर्यंत इच्छुक म्हणतात, तुमच्या शब्दाबाहेर नाही आणि नंतर तसे वागत नाही. खुर्चीत बसल्यावर आसवानी यांनी बदलू नये. मंगला कदम म्हणाल्या, या पदासाठी शिक्षण महत्त्वाचे नाही तर ‘गणित’ महत्त्वाचे आहे. संजोग वाघेरे म्हणाले, २०१७ च्या निवडणुका लक्षात घेऊन आसवानींनी काम करावे. आझम पानसरे म्हणाले, कामे भरपूर होतात. मात्र, प्रसिद्धीत कमी पडतो. पिंपरीत महत्त्वाची तीन पदे आहेत, त्याचा पक्षाला मोठा फायदा मिळवून द्यावा. अतुल शितोळे म्हणाले, २४ तास पाणीपुरवठय़ासारखे अनेक ‘मोठे’ विषय तुमच्यासाठीच ठेवले आहेत, ते मार्गी लावावेत. समीर मासूळकर म्हणाले, आसवानींच्या माध्यमातून आमच्याच ‘वाडय़ात’ पद आले आहे, असा प्रभाकर वाघेरे यांचा फोन आला, तो सूचक होता. अध्यक्षांनी क्रीडा क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. जावेद शेख म्हणाले, निवडून आणावयाच्या त्या १० जणांच्या यादीत आपल्याला ‘दत्तक’ घ्यावे. याशिवाय, कविचंद भाट, हरेश बोधानी, शमीम पठाण, सुलभा उबाळे, नारायण बहिरवाडे आदींची भाषणे झाली.
‘शहराला ‘मॉडेल स्मार्ट सिटी’ करणार’
शहरविकासासाठी प्रयत्न करणार, असे सांगत ‘स्मार्ट सिटी’त समावेश होऊ शकला नाही, तरी शहराला ‘मॉडेल स्मार्ट सिटी’ करणार, अशी भावना डब्बू आसवानी यांनी व्यक्त केली. कामाचा दर्जा राखणार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कचरा समस्या प्राधान्याने सोडवणार आणि महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणार.