रस्त्यांवर फुले, खेळणी, कचऱ्याच्या पिशव्या अशा वस्तू विकणारी मुले पाहिली, की या मुलांचे भवितव्य काय, असा प्रश्न सहज मनात डोकावतो. पण, या प्रश्नाकडे आत्मीयतेने पाहण्याचा वेळ बहुतांश मंडळींकडे नसतो. हा वेळ काढून या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून ॲड. अभिजित पोखरणीकर हा युवक झटतो आहे. येत्या १२ ऑगस्टला असलेल्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने श्रीराम ओक यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.

रस्त्यावरील मुलांसाठी काम करावे, अशी प्रेरणा कुठून मिळाली?

  • एके दिवशी मार्केटयार्ड परिसरातील सिग्नलवर फुले विकणाऱ्या एका मुलीला, ‘तू शाळेत जातेस का,’ असे मी सहज विचारले, त्यावर तिने अत्यंत निरागसपणे मलाच विचारले, ‘शाळा म्हणजे काय?’ क्षणभर मी स्तब्ध झालो आणि त्याच क्षणी निर्धार केला, या मुलीसह तिच्यासारख्या अनेक मुलांना शाळेत जाता यावे म्हणून काही तरी करायचे. आणि, त्याच दिवशी त्या मुलीला आणि पदपथावर काम करणाऱ्या तिच्यासारख्या मुलांना मी त्याच ठिकाणी शिकविण्यास सुरुवात केली. त्यातून ‘दादाची शाळा’ या नावाची चळवळ पुण्यात २०२० मध्ये सुरू झाली. दादाने सुरू केलेली शाळा, म्हणून ‘दादाची शाळा. ही शाळा सकाळी आणि संध्याकाळी भरते आणि ही मुले विविध प्रकारचे शिक्षण घेतात. अशा शाळा सध्या पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि अमरावती येथे सुरू असून, आगामी काळात राज्यातील अधिकाधिक जिल्ह्यांमध्ये हे काम विस्तारण्याचे नियोजन आहे.

‘दादाची शाळा’ या उपक्रमात इतर युवक कसे जोडले गेले?

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात सिग्नलवर, विविध वस्त्यांमध्ये, बांधकामांवर आणि रस्त्यावर राहणारी अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी काही करावे, हा यामागचा उद्देश. तसाच उद्देश असलेले माझ्या मित्रपरिवारातील शुभम माने, अबोली राऊत, अंजली शिंदे यांच्यासह अनेक तरुण स्वयंसेवक या चळवळीशी जोडले गेले. आज ही संस्था पूर्णपणे युवकांच्या सहभागातून उभी राहिलेली शिक्षण चळवळ आहे.

मुलांना शिकविण्याची पद्धत कशी आहे?

  • पूरक शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, जीवनकौशल्ये, करिअर मार्गदर्शन, पालकांचे समुपदेशन आणि उच्च शिक्षणापर्यंत सातत्याने साथ देण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. ‘दादाची शाळा’ केवळ एवढ्यावरच थांबत नाही, तर शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, शाळेत प्रवेश मिळवून देणे हेही करते. ही संस्था रस्त्यावर राहणारी, झोपडपट्ट्यांतील, स्थलांतरित कुटुंबांतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे. आजवर १,७०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत संस्थेचे कार्य पोहोचले असून, सध्या ४७२ विद्यार्थी नियमितपणे शिक्षण घेत आहेत. विविध क्षेत्रांत कार्यरत २५० हून अधिक स्वयंसेवक या कार्यात सक्रिय आहेत. ‘दादाच्या शाळे’च्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील शिक्षित विद्यार्थी ठरले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणाची वाट धरली आहे.

    शाळेमार्फत अजून कोणते उपक्रम चालविले जातात?

    • सर्वांगीण विकासावर भर देत असताना ‘बालवाणी’ या मुलांनी चालविलेल्या पॉडकास्टद्वारे मुलांना स्वतःचे विचार मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय शिष्यवृत्ती साहाय्य, स्वयंसेवक प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता कार्यशाळा, आरोग्य व मासिक पाळी स्वच्छता जनजागृती, पुस्तकदान चळवळ, वाचन संस्कृती अभियान, युवकांसाठी शिष्यवृत्ती आणि इंटर्नशिपसारखे विविध उपक्रमही राबविले जातात. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा घटनात्मक आणि मानवी अधिकार आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत नाही, तोपर्यंत आमचा प्रवास थांबणार नाही. ‘बालसाक्षर महाराष्ट्र’ घडवणे हे आमचे अंतिम स्वप्न आहे.

    shriramoak@expressindia.com