पुणे : रेल्वेच्या प्रवासात एका डुलक्यानेही लाखो रुपयांचा फटका बसू शकतो. दादर-तिरुनेलवेली एक्सप्रेसमधील एका प्रवाशाला चार महिन्यांपूर्वी एका प्रवाशाला याच चुकीचा प्रत्यय आला. त्याचा तब्बल सहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. पण, रेल्वे पोलीसांनी मोठ्या थरारानंतर ही चोरी उघडकीस आणली. चोरी करणाऱ्या महिलेला पुणे रेल्वे स्थानकावर सापळा रचून पकडण्यात आले. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने तब्बल चार महिने या प्रकरणाचा तपास सुरू होता.

एक चूक आणि ६ लाखांचा फटका

ही गोष्ट सुरू होते, आजपासून चार महिन्यांपूर्वी. ७ जानेवारीला दादर-तिरुनेलवेली एक्सप्रेसमधून एक प्रवासी प्रवास करत होता. गाडीच्या ‘एस-७’ डब्यात त्याला सीट मिळालेली. दादर स्थानकातून सायंकाळी सुटलेली गाडी रात्र होता होता पुण्याजवळ पोहोचली. प्रवाशाचा डुलका लागला. जवळ असलेली हँडबॅग पायाशी ठेवून तो मोठ्या विश्वासाने धावत्या गाडीत झोपी गेला. जाग आली तेव्हा मात्र होत्याचे नव्हते झालेले. पायाशी असलेली हँडबॅग दिसेनाशी झाली. बॅगेत ४५ ग्रॅम सोन्याचे ६ लाख रुपयांचे मंगळसूत्र, १६ हजार रुपयांचा मोबाईल आणि १० हजार रुपये रोख, असा ६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे वेगळीच. काय करावे, हे त्याला सुचेना. शेवटी, या प्रवाशाने रेल्वे मदतीच्या (RailMadad) माध्यमातून तक्रार नोंदवली. त्या आधारे रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून घेतला. प्रवाशाला चोरीला गेलेले दागिने, साहित्य परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

‘यात्री सुरक्षा’मोहीम आणि शोधाशोध

या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) स्वीकारले. मध्य रेल्वेकडून राबवण्यात येत असलेल्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत या चोरीचा तपास करण्याचे ठरले. त्यासाठी दादरपासून पुण्यापर्यंत तिरूनेलवेली एक्सप्रेस जिथे जिथे थांबली त्या सर्व स्थानकांमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. हे शेकडो तासांचे चित्रण रेल्वे पोलिसांनी अभ्यासले. रेल्वेच्या रेकॉर्डमधील जुन्या गुन्हेगारांची माहिती काढली. त्यानंतर एका महिलेवर पोलीसांचा संशय बळवला. तिचा सुगावा लागला, पण सुरुवातीला काहीच हाती आले नाही. पण, पोलिसांनी जिद्द सोडली नव्हती. रेल्वे पोलीसांचे विशेष तपास पथक सलग चार महिने या महिलेच्या मागावर होते. अखेर ४ मेला संशयित महिला पुणे रेल्वे स्थानकावर वावरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आणि घडल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने सापळा रचला. साध्या वेशातील पोलिसांनी त्या संशयित महिलेला घेराव घातला. पोलिसांची चाहूल लागताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ती पुरती अडकली होती.

चौकशी आणि गुन्ह्याची कबुली

या प्रकरणात पोलीसांनी शीतल सतीश भोसले उर्फ शीतल आप्पा काळे (वय २२) हिच्यासह एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, तपासाअंती तिने गुन्हा कबुल केला. लोणावळा ते पुणे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वे गाडीत इतर साथीदारांच्या मदतीने हँडबॅग चोरल्याची कबुली तिने दिली. त्यात असलेले ४५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, मोबाईल आणि रोख रक्कम चोरल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शीतल भोसले हिला अटक केली. तर, नियमांप्रमाणे अल्पवयीन मुलीला समज देऊन सोडण्यात आले. चोरीला गेलेले सोने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या चोरीत आणखी कोणाचा सहभाग होता किंवा त्यांनी इतर कोठे चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास रेल्वे पोलीसांकडून करण्यात येत असल्याची मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.