पुणे : जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये वृंदावनमधील प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. सध्याच्या युद्धाच्या कालखंडामध्ये राधा-कृष्णाच्या प्रेमभावनेत तल्लीन करणारा आध्यात्मिक प्रवास यानिमित्ताने घडविण्यात येणार आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण या वेळी उपस्थित होते. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात यंदाच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक नितेश कुमार यांच्या हस्ते झाला. कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांनी मंदिराच्या प्रतिकृतीचे काम केले आहे

हेमंत रासने म्हणाले, ‘मनमोहक संगमरवरी वास्तुकलेसाठी आणि उत्कृष्ट कोरीव कामासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेम मंदिराची प्रतिकृती यंदाच्या उत्सवामध्ये साकारण्यात येणार आहे. भव्य स्तंभ, प्रकाशमान घुमट आणि कृष्णलीलांचे दर्शन यांसाठी सुपरिचित असलेल्या या मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये  संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित भव्य दर्शन भाग असणार आहे. उत्तर भारतीय मंदिराच्या पारंपरिक रचनेचे प्रतिबिंब दर्शवणारी कलाकुसर केलेले स्तंभ आणि घुमट, रासलीला, गोवर्धन लीला, झुला यांसारख्या कृष्णलीला दर्शविणारे शिल्पपट असणार आहेत. शोभिवंत फुलांची सजावट, पवित्र शुभचिन्हे आणि आकर्षक विद्युतरोषणाईमुळे सायंकाळनंतर हे मंदिर उजळून निघणार आहे.’

अशी असेल प्रेम मंदिराची प्रतिकृती

  • प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच
  • यामध्ये अनेक भव्य खांब आणि विविध मूर्तींचा समावेश
  • गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत
  • भाविकांना लांबून सहजतेने गणरायाचे दर्शन घेण्याची सुविधा

भौतिकवाद आणि विभाजनाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या जगात प्रेम, भक्ती, सलोखा आणि श्रद्धा या मानवतेला एकत्र बांधणाऱ्या शक्तींचा मिलाफ प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीद्वारे मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारण्यात येणार आहेत. मंदिराच्या वर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती असेल. वृंदावनामधील विलोभनीय प्रेम मंदिराच्या देखाव्यामुळे देशातील धार्मिक, सांस्कृतिक वैभवाचे दर्शन येथे घडेल. त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढण्यास मदत होईल. – महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट