सध्याच्या काळामध्ये नैसर्गिक संकटांमध्ये आपद्ग्रस्त झालेल्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यासाठी पुढे येत आहेत ही समाधानाची बाब आहे. गारपीटग्रस्तांना मदत करण्यामध्ये पुढाकार घेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने अशा कार्यामध्ये नवा पायंडा पाडला आहे, असे मत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेश मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत आयोजित संगीत महोत्सवाचे उद्घाटन नीला सत्यनारायण यांच्या हस्ते झाले. नीला सत्यनारायण यांनी ट्रस्टच्या उपक्रमासाठी २० हजार रुपयांचे अर्थसाह्य़ करण्याचे जाहीर करून गारपीटग्रस्त एका मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण आणि रवींद्र माळवदकर या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात ‘स्वराभिषेक’ कार्यक्रमामध्ये शौनक अभिषेकी आणि कल्पना झोकरकर यांनी नाटय़गीते आणि भक्तिगीते सादर केली.
अशोक गोडसे म्हणाले,की गारपीटग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. इंदापूरमधील निमगाव केतकी येथील १५ कुटुंबांना पक्की घरे बांधून देण्याबरोबरच तेथील मुलांचे शैक्षणिक पालकत्वदेखील स्वीकारले जाणार आहे. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी मनुष्यहानी झाली असून जनावरे दगावली आहेत. अशांना जगण्याचा आधार मिळावा या उद्देशातून प्रत्येक कुटुंबाला पाच शेळ्याही देण्यात येणार आहेत.