scorecardresearch

आवाजाच्या दणदणाटात दहीहंडी जल्लोषात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहापर्यंत ध्वनिवर्धक सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने त्यानंतरच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

आवाजाच्या दणदणाटात दहीहंडी जल्लोषात
एकावर एक असे सहा थर रचून कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाच्या गोविंदांनी सुवर्णयुग तरुण मंडळाने उभारलेली दहीहंडी फोडली.

पुणे : ‘गोविंदा आला रे आला’, ‘मच गया शोर सारी नगरी रे’, ‘चंद्रा’ यांसारख्या गीतांवर थरकणारी तरुणाई… छातीत धडकी भरेल असा आवाजाचा दणदणाट… डोळ्यासमोर काही दिसूच नये अशी दिव्यांची उघडझाप… आवाजाचा बार उडवून बाहेर पडणाऱ्या झिरमळ्यांचा पाऊस… तारे-तारकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांची उपस्थिती… अशा जोशात आणि दणदणाटात गणेशोत्सवाची रंगीत तालीम असलेला दहीहंडी उत्सव दोन वर्षांची कसर भरून काढत शुक्रवारी जल्लोषात साजरा झाला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहापर्यंत ध्वनिवर्धक सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने त्यानंतरच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. करोनामुळे दोन वर्षे उत्सव साजरा करण्यावर बंधने होती. ही कसर यंदाच्या दहीहंडी उत्सवामध्ये भरून निघाली. सायंकाळपासूनच शहराच्या मध्य भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. सुवर्णयुग तरुण मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ या मंडळांच्या दहीहंडीचा जल्लोष अनुभवण्यासाठी पुणेकरांसह उपनगरातील नागरिकांनी गर्दी केली हाेती. दहीहंडी फोडणाऱ्या संघांना मोठ्या रकमेची पारितोषिके जाहीर करण्यात आली होती. गणेशोत्सवांची नांदी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या दहीहंडीमुळे पुणेकरांना उत्सवाचे वेध लागल्याची चुणूक या निमित्ताने पाहावयास मिळाली. रात्री दहापूर्वी दहीहंडी फुटेल याची दक्षता सर्वच मंडळांनी घेतली होती.

बावधन येथील दहीहंडी उत्सवाला अमृता फडणवीस यांनी रात्री साडेआठच्या सुमारास हजेरी लावली. त्यांनी सर्व गोविंदांना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला. पुणेकरांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘कौन कहते है भगवान आते नही, तुम मीरा के जैसे बुलाते नही’ हे गीत सादर केले. गोविदांना विम्याचे कवच देण्याचा निर्णय घेण्याच्या सरकारच्या धोरणाचे त्यांनी कौतुक केले.

पाण्याचे फवारे अंगावर घेऊन बेधुंद होऊन नाचण्यासाठी गोपाळभक्तांसह गोविंदांनी शहराच्या मध्यवर्ती भागात दहीहंडी मंडळांपुढे मोठी गर्दी केली होती. दहीहंडी सोहळा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पोलीस आणि वाहतूक विभागाकडून प्रमुख रस्त्यांसह काही अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. त्यामुळे नदीपात्र किंवा जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावून गोविंदा दहीहंडीचा आनंद घेत होते.

टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रोड, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता, कर्वे रस्ता यासह अन्य मार्गावर संध्याकाळानंतर वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून आले. उपनगरांमध्ये मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच अंतर्गत रस्त्यावर दहीहंडी सोहळा साजरा करण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाने जावे लागत होते. काही ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे चालकांना मोठा वळसा घालून जावे लागले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या