पुणे : अनेक रोगांच्या साथीचे धोके परिचित आहेत. असे असले तरी या रोगास कारणीभूत ठरणारे विषाणू, जिवाणूंसह परजीवी घटकांचे उत्परावर्तन होत आहे. त्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारा धोका वाढून महासाथ येण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. सर्वच देशांतील संशोधकांना भविष्यातील महासाथीला तोंड देण्यासाठी आतापासून उत्परावर्तित परजीवींचे संशोधन करण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची जागतिक महासाथ सज्जता परिषद नुकतीच ब्राझीलमधील रिओ दी जानेरोमध्ये झाली. या परिषदेवेळी कोॲलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन्स (सीईपीआय) आणि जागतिक आरोग्य संघटनेने भविष्यातील महासाथीबाबतचा अहवाल जाहीर केला. या अहवालात म्हटले आहे, मानवी संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या परजीवींपासून निर्माण होणारा धोका ज्ञात आहे. मात्र ते उत्परावर्तित झाल्यास त्यांच्यापासून निर्माण होणारा धोका अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे अशा परजीवींवर संशोधन सुरू ठेवणे आवश्यक आहे. या परजीवींवर संशोधन करून भविष्यात त्यापासून मानवाला निर्माण होणारा धोका कमी करता येईल.

आणखी वाचा-जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जाणून घ्या स्तनपानाचे माता अन् बालकांसाठी फायदे…

परजीवींमधील उत्परावर्तनावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि संशोधन या दोन मुद्द्यांवर संघटनेने भर दिला आहे. संघटनेने म्हटले आहे की, परजीवी घटकांच्या संसर्गाचे माध्यम, मानवी संसर्ग आणि त्याचा मानवी प्रतिकारशक्तीवरील परिणाम या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. परजीवींचे जास्तीत जास्त उत्परावर्तित प्रकार शोधल्यानंतर भविष्यातील त्यांच्या महासाथीपासून संरक्षणाचा उपायही शोधता येईल. जगातील अनेक देशांमध्ये परजीवींवरील संशोधनाची सुविधा नसल्याने तेथील उत्परावर्तित प्रकारांबाबत आपण अंधारात आहोत. यामुळे सर्वच देशांतील शास्त्रज्ञांनी यासाठी पुढाकार घेऊन एकत्रितरित्या प्रयत्न करायला हवेत.

पन्नास देशांतील दोनशे शास्त्रज्ञांचा सहभाग

या अहवालात ५० देशांतील २०० शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. या शास्त्रज्ञांनी २८ विषाणू घराणी आणि बुरशीचा एक मुख्य समूह यांचे शास्त्रीय आणि पुराव्याच्या आधारे मूल्यमापन केले आहे. एकूण १ हजार ६५२ उत्परावर्तित प्रकार तपासण्यात आले. त्यानुसार या प्रकारांपासून साथ आणि महासाथ यापैकी कोणता धोका निर्माण होऊ शकतो, याबद्दल आडाखे बांधण्यात आले.

आणखी वाचा-राज्यभरातील बाजारपेठा २७ ऑगस्टला बंद? व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात का?

पुढील महासाथ येणार असून, ती कधी येणार असा केवळ प्रश्न आहे. भविषातील महासाथीला तोंड देण्यासाठी विज्ञान आणि राजकीय इच्छाशक्ती यांची गरज आहे. परजीवींच्या उत्परावर्तित प्रकारांबद्दल संशोधनासाठी सर्व देशांतील संशोधकांची मदत हवी आहे. -डॉ. टेडरॉस ॲडहोनम घेब्रेयेसिस, महासंचालक, जागतिक आरोग्य संघटना