scorecardresearch

खंबाटकी बोगद्यात अंधार

राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या पुणे-सातारा रस्त्यावरील खंबाटकी बोगद्यात केवळ दहा टक्के दिवे सुरू असल्याने बोगद्यात अंधार पसरला असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

केवळ दहा टक्के दिवे सुरू

पुणे : राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या पुणे-सातारा रस्त्यावरील खंबाटकी बोगद्यात केवळ दहा टक्के दिवे सुरू असल्याने बोगद्यात अंधार पसरला असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत सजग नागरिक मंचच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली असता, सर्व दिवे सुरू असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात बोगदा अंधारातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या पुणे-सातारा बाह्यवळण मार्गाच्या कामाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. रखडलेली कामे आणि त्यामुळे होणारे अपघात हा विषय नित्याचा झाला असतानाच या मार्गावरील बोगद्यांबाबतही गंभीर प्रश्न समोर आला आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली आहे.

महामार्गावरील बोगद्यातील ८० ते ९० टक्के दिवे अनेकदा बंद असल्याचा प्रकार यापूर्वीही समोर आला आहे. वेलणकर हे १२ डिसेंबरला याच रस्त्याने प्रवास करीत असताना साताऱ्याकडून पुण्याकडे येताना खंबाटकी बोगद्यात केवळ दहा टक्केच दिवे सुरू असल्याचे आढळून आले. हा गंभीर प्रकार लक्षात घेता त्यांनी त्याची छायाचित्रे काढली आणि पुराव्यांसह प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या तक्रारीला प्रतिसादही देण्यात आला. बोगद्यात सर्व आलबेल असून, सर्व दिवे सुरू असल्याबाबतची छायाचित्रेही अधिकाऱ्यांनी वेलणकर यांना पाठविली. मात्र, अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्याची खात्री करण्यासाठी वेलणकर यांनी सोमवारी या मार्गाने जाणाऱ्या काही नागरिकांना वस्तुस्थिती पुन्हा पडताळून पाहण्याची विनंती केली. त्यानुसार या नागरिकांनी खंबाटकी बोगद्यातून जाताना सोमवारीही छायाचित्रे काढली. त्यातही बोगद्यात केवळ १० टक्केच दिवे सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेला दावा फोल असल्याचे स्पष्ट झाले.

वेलणकर यांनी पुन्हा याबाबत वरिष्ठांकडे तक्रार नोंदविली. अद्यापही बोगद्यातील सर्व दिवे सुरू नाहीत. विशेषत: बोगद्याच्या सुरुवातीला सगळे दिवे सुरू असणे आवश्यक आहे. उजेडातून एकदम अंधारात गेल्यावर अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे ते आवश्यक आहे. आपल्या अधिकाऱ्यांनी आपली दिशाभूल केली, हे स्पष्ट आहे. अपघात होईपर्यंत वाट पाहण्यापेक्षा संबंधितांवर कारवाई करून बोगद्यातील १०० टक्के दिवे सुरू करावेत, अशी मागणी वेलणकर यांनी प्राधिकरणाचे पुणे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्याकडे केली आहे.

पुणे-सातारा रस्त्यावरील खंबाटकी बोगद्यात केवळ दहा टक्केच दिवे सुरू असल्याबाबत तक्रार केल्यानंतर सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा बोगद्याची पाहणी केल्यानंतर दिव्यांची स्थिती तशीच असल्याचे स्पष्ट झाले. अनेक दिवे सुरू नसल्याने बोगद्यात अपघाताचा धोका वाढला आहे. अपघात होण्याची वाट न पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Darkness night day khambhatki tunnel ysh

ताज्या बातम्या