हिंजवडी पोलिसांनी दर्शनाचा मोबाईल अखेर सीआयडीला तपासासाठी दिला

संगणक अभियंता दर्शना टोंगरे हिच्या खुनानंतर जप्त केलेला तिचा मोबाइल व ती वापरत असलेल्या संगणकाची ‘हार्ड डिस्क’ हिंजवडी ठाण्याच्या पोलिसांनी अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) दिली आहे.

संगणक अभियंता दर्शना टोंगरे हिच्या खुनानंतर जप्त केलेला तिचा मोबाइल व ती वापरत असलेल्या संगणकाची ‘हार्ड डिस्क’ हिंजवडी ठाण्याच्या पोलिसांनी अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) दिली आहे. मात्र, हिंजवडी पोलिसांनी दिलेला मोबाइल व इतर वस्तू या तिच्याच आहेत, याबाबतचे न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र देण्यास सीआयडीने हिंजवडी पोलिसांना सांगितले आहे.
 आयबीएम कंपनीत प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून काम करणाऱ्या दर्शनाचा ३० जुलै २०१० रोजी खून झाला. तिला बावधान रस्त्यावर शिंदे पेट्रोल पंपासमोर चाकूने भोसकून मारण्यात आले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार डिसेंबर २०१२ मध्ये या गुन्ह्य़ाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला. दर्शनाचा खून झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तिच्या घरी जाऊन दर्शनाचा मोबाइल आणि ती वापर असलेल्या संगणाकाच्या हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या. त्या वस्तूंची सीआयडीने हिंजवडी पोलिसांकडे आठ वेळा मागणी करूनही त्यांना मिळाल्या नव्हत्या. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रसिद्ध केल्यानंतर अखेर हिंजवडी पोलिसांनी दर्शनाचा एक मोबाइल व दोन हार्ड डिक्स या सीआयडीला दिल्या आहेत.  याबबात पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले, की दर्शना टोंगरेचा मोबाइल व हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या. त्या वेळी जप्तीपंचनामा केलेला नसल्याने या वस्तू कुठेच रेकॉर्डवर सापडत नव्हत्या. या वस्तूचा शोध घेऊन त्या सीआयडीला देण्यात आल्या आहेत.
सीआयडीचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी सांगितले, की हिंजवडी पोलिसांनी मोबाइल व दोन हार्ड डिस्क दिल्या आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या वस्तू या दर्शना टोंगरे हिच्याच आहेत, याबाबतचे न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र देण्यास सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Darshana tongare murder case